पुणे – विषय समित्या निवडणुका पुढील आठवड्यात

महापालिकेत इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू

पुणे – महापालिकेतील विषय समित्यांच्या निवडणुका पुढील आठवड्यात होणार आहेत. समित्यांच्या अध्यक्षपदासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी करण्याला सुरूवात केली आहे. भाजपशी युती झाल्यामुळे शिवसेनेला पुण्यातील सत्तेमध्ये वाटा हवा आहे. त्यामुळे एखाद्या विषय समितीचे अध्यक्षपद शिवसेनेला मिळण्याची शक्‍यता आहे.

महापालिकेच्या महिला बालकल्याण समिती, क्रीडा समिती, शहर सुधारणा समिती, विधि समिती अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी 30 एप्रिलपासून दुपारी 3 ते 5 यावेळेत अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे.

चार मे रोजी सकाळी 11 वाजता निवडणूक प्रक्रिया पार पडेल. यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून पीएमपीएमएलच्या व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे काम पहाणार आहेत, अशी माहिती नगरसचिव सुनील पारखी यांनी बुधवारी दिली.

विषय समित्यांवर मागील महिन्यामध्ये सदस्यांची नियुक्‍या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्यात येईल. महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत असल्यामुळे सर्व विषय समित्यांचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे भाजपकडेच आहे. त्यामुळे यामध्ये विरोधी पक्षांना फारशी संधी नाही. असे असले, तरी भाजपचे मित्र पक्ष असलेल्या शिवसेना आणि रिपाइं यांच्यामधून विषय समित्यांमध्ये अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष मिळावे, यासाठी मागणी जोर धरू लागली आहे.

महापलिकेतील चार विषय समित्यांपैकी दोन विषय समित्यांचे अध्यक्षपद आणि दोन प्रभाग समित्यामचे अध्यक्षपद शिवसेनेला द्यावे, अशी मागणी आम्ही करणार असल्याचे शिवसेनेचे गटनेते संजय भोसले यांनी सांगितले.

दरम्यान, प्रभाग समित्यांच्या निवडणुकाही पुढील आठवड्यात 6 मे रोजी होणार असून, त्यासाठी 2 मे रोजी अर्ज मागवण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)