विश्‍वासार्हता जोपासल्यानेच जावळी बॅंकेची प्रगती 

कुडाळ  – स्पर्धेच्या युगातही ग्रामीण भागातील बॅंकेने मुंबई सारख्या शहरात स्वत:चे स्थान निर्माण करून “ग्राहक व सभासदांना अविरत व तत्पर सेवा दिल्याने दादर परिसरात जावली बॅंकेची विश्‍वासार्हता टिकून आहे. दादर हे उपनगर वेगाने विकसित होत असून बॅंकेच्या व्यवसायामध्ये वाढ करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल’, असे गौरवोद्‌गार माजी मुख्यमंत्री व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी बोलताना व्यक्त केले.

डीएमके जावळी सहकारी बॅंकेच्या दादर शाखेचे नवीन वास्तूत नुकतेच स्थलांतर झाले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बॅंकेचे अध्यक्ष चंद्रकांत गावडे यांनी बॅंकेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतला. तसेच नवीन वास्तूत अत्याधुनिक बॅंकिंग यंत्रणेसह एटीएम सेंटरची सोय ग्राहकांना उपलब्ध करून दिली असल्याचे सांगून बॅंकेने मल्टीस्टेट दर्जा प्राप्त केलेला असून भविष्यात 1500 कोटी रुपये ठेवींचा टप्पा पूर्ण करून शेड्युल्ड दर्जा प्राप्त करण्याचा मनोदय असल्याचे व बॅंकेच्या नवीन शाखाही लवकरच महाराष्ट्रात सुरु होणार असल्याची माहिती अध्यक्ष गावडे यांनी यावेळी दिली.

बॅंकेचे उपाध्यक्ष प्रकाश मस्कर यांनी ग्राहकांना कोअर बॅंकींग, एटीम, आरटीजीएस, एनईएफटी, एसएमएस, मोबाईल बॅंकिंग, सुविधा दिल्याची माहिती दिली. शाखाप्रमुख मारूती भिलारे म्हणाले, दादर शाखेची सुरुवात 2013 मध्ये झाली असून या शाखेचा व्यवसाय 50 कोटीपेक्षा अधिक आहे. आजच्या स्थलांतरित कार्यक्रमादिवशी साडेतीन कोटींच्या ठेवी मिळालेल्या आहेत. अत्याधुनिक सेवेसह नवीन इमारतीत स्थलांतरित झालेल्या शाखेचे उद्‌घाटन माजी मुख्यमंत्री व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सातारा जावलीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, बॅंकेचे अध्यक्ष चंद्रकांत गावडे, उपाध्यक्ष प्रकाश मस्कर यांच्यासह माजी अध्यक्ष विक्रम भिलारे, प्रविण देवारे,नरेंद्र सावंत यांच्यासह सर्व संचालक मंडळ व मान्यवर तसेच दादर परिसरातील सभासद व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बॅंकेच्यावतीने सर्व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)