पाथर्डीत कमळ फुलविल्याची तर शेवगावमध्ये घड्याळाला चावी दिल्याची चर्चा

मताधिक्‍क्‍याच्या आकडेमोडीसाठी रंगताहेत बैठकांचे फड
बाबासाहेब गर्जे

पाथर्डी – नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीनंतर पाथर्डी-शेवगाव विधानसभा मतदारसंघात पाथर्डीकरांनी कमळ फुलविल्याची तर शेवगावकरांनी घड्याळाला चावी दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजपचे मताधिक्‍क्‍य वाढेल की घटेल या चर्चेने गावागावात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचे आकडेमोडीच्या बैठकांचे फड रंगत असल्याचे चित्र दिसत आहे.

पाथर्डी तालुक्‍याचा अर्धा भाग शेवगाव विधानसभा मतदारसंघाला तर अर्धा भाग राहुरी विधानसभा मतदारसंघाला जोडला गेल्यामुळे तालुक्‍याचे दोन्हीही तुकड्यांची वेगवेगळी राजकीय समीकरणे तयार झालेली आहेत. कासार पिंपळगाव, टाकळीमानुर व भालगाव हे तीन जिल्हा परिषद गटांसह पाथर्डी शहर शेवगाव विधानसभा मतदारसंघाला जोडले गेले आहेत. पाथर्डी- शेवगाव मतदारसंघाच्या आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्‍यातील बहुसंख्य स्थानिक स्वराज्य संस्था भाजपच्या ताब्यात आहेत. तिसगाव व मिरी हे दोन जिल्हा परिषद गट राहुरी मतदारसंघाला जोडले गेलेले आहे. भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे या परिसरावर प्रभुत्व आहे. तालुक्‍यातील पाच जिल्हा परिषद गटापैकी एक शिवसेना, तीन भाजप तर एका गटावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यात आहे. पाथर्डी नगरपालिका व पंचायत समिती भाजपच्या ताब्यात आहेत.

स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे व ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मोठ्या फळीमुळे पाथर्डी तालुक्‍याला भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या आ. मोनिका राजळे यांना एक लाख 34 हजार 685 मते मिळाली होती तर राष्ट्रवादीचे चंद्रशेखर घुले यांना 81 हजार 500 मते मिळाली होती. पाथर्डीसह शेवगाव तालुक्‍यातूनही राजळे यांना मताधिक्‍य मिळाले होते.

स्व. मुंडे यांच्या निधनानंतर झालेल्या या विधानसभा निवडणुकीत स्व.मुंडेंना श्रद्धांजली म्हणून मतदारांनी भाजपला मते दिली. स्व. राजीव राजळे लोकसभेला पराभूत झाले होते. विधानसभेला मोनिका राजळे यांच्याविषयी सहानुभूती निर्माण झाली. या सर्व परिस्थितीला मोदी लाटेची जोड असल्याने पाथर्डी – शेवगाव मतदारसंघात भाजपच्या राजळे यांना 53 हजाराचे उच्चांकी मताधिक्‍य मिळाले. त्या विधानसभेच्या तुलनेत नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीची परिस्थिती काहीशी वेगळी असल्याने जाणवते. लोकसभा निवडणुकीला पाथर्डी – शेवगाव मतदार संघातील तीन लाख 38 हजार 788 मतदारांपैकी दोन लाख 14 हजार 785 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

आमदार मोनिका राजळे यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात विधानसभा निवडणुकीचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून डॉ. सुजय विखे यांना खंबीर साथ दिली. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे व शिवाजीराव काकडे यांना राष्ट्रवादीच्या प्रचारात सक्रिय करून जुळवाजुळवीचे राजकारण केले. माजी आमदार चंद्रशेखर घुले व नरेंद्र घुले या बंधूंनीही आगामी धोक्‍याची घंटा ओळखून प्रतिष्ठा पणाला लावत संग्राम जगतापांना साथ दिली.

जातीसाठी माती या प्रचाराचाही शेवगावसह पाथर्डीतही काहीसा प्रभाव दिसला. तळापर्यंत पोहोचलेल्या यंत्रणेकडून मतदारांच्या अपेक्षा वाढल्या. लक्ष्मीची पावले धुसर झाल्याचा परिणामही झाल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विखे यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपची उमेदवारी केली. या सर्व गोष्टीचा काही अंशी परिणाम भाजपच्या मताधिक्‍यावर होतांना दिसतो. पाथर्डी तालुक्‍यातील टाकळीमानुर व भालगाव जिल्हा परिषद गटात व पाथर्डी शहरात स्व. गोपीनाथ मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. लोकसभेचे भाजपचे उमेदवार डॉ. विखे यांनीही गेल्या दोन वर्षापासून या परिसरावर लक्ष केंद्रीत केले होते.

कासार पिंपळगाव जिल्हा परिषद गटावर आमदार मोनिका राजळे यांचे वर्चस्व असल्याने या विधानसभा मतदार संघात पाथर्डी परिसरातील मतदारांनी भाजपच्या बाजूने कौल दिल्याची चर्चा आहे. मात्र राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या हाकेला ओ देऊन शेवगावकरांनी घड्याळाला चावी दिल्याने 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी भाजपचे मताधिक्‍य निम्म्याने घटण्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)