अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचे पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेला आदेश
पुणे – शहरी भागात नदीलगतच्या भागांमध्ये पाणी शिरत असलेली ठिकाणे निश्चित करून त्या भागात राहणाऱ्या लोकांच्या स्थलांतराचा आराखडा तयार करण्यात यावा. त्याचबरोबर पालिकेच्या हद्दीतील सर्व जुन्या पुलांचे व जुन्या इमारतींचे बांधकाम तपासणी (स्ट्रकचरल ऑडिट) पावसाळ्यापूर्वी करून घेण्यात यावे, नदीपात्रातील अतिक्रमणांवर कार्यवाही करावी, अशा सूचना अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेला दिल्या आहेत.
मान्सूनपूर्व तयारी बैठक व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक अतिरिक्त जिल्हाधिकारी काळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे यांच्यासह पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पोलीस प्रशासन, नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद, आरोग्य, कृषी विभाग आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी यांनी सर्व विभागांचा आढावा घेतला.
पावसाळ्यात वादळी वाऱ्यासह झाडे उन्मळून पडून मनुष्य व वित्तहानी होऊ नये, यासाठी धोकादायक वृक्षांची छाटणी करावी. महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये झालेल्या आपत्तीजन्य घटनांची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षास द्यावी. नदीपात्रालगत, पात्रातील झोपटपट्टया व इतर धोक्याच्या ठिकाणंचा अभ्यास करून योजना ठरवाव्यात. नदीपात्रातील गाळ व जलपर्णी काढणे, तसेच धोकादायक जागांचे सर्व्हेक्षण करावे. गटार सफाई आणि औषध फवारणी करावी, अशा सूचना काळे यांनी यावेळी दिल्या.