पुणे – मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने एप्रिलमध्ये केलेल्या तिकीट तपासणीमध्ये तब्बल 37 हजार 779 प्रवासी दोषी आढळले. या प्रवाशांवर कारवाई करून त्यांच्याकडून 2 कोटी 7 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने एप्रिल महिन्यात पुणे मळवली, पुणे-बारामती, मिरज-कोल्हापूर या विभागांमध्ये तिकीट तपासणी मोहीम राबविली होती. यात विनातिकिट प्रवास करणे, चुकीचे तिकीट काढून प्रवास करणे, चुकीच्या कोचद्वारे प्रवास करणे असे प्रकार करणाऱ्या 37 हजार प्रवाशांवर कारवाई करून त्यांच्याकडून 2 कोटी 7 लाख 4 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यात केलेल्या कारवाईत तब्बल 16 हजार 106 प्रवासी विनातिकीट प्रवास करताना पकडले गेले.
या फुकट्या प्रवाशांकडून तब्बल 99 लाख 72 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. विभागीय व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर, अतिरिक्त व्यवस्थापक आणि वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, गेल्या वर्षी एप्रिल 2018 मधील तिकीट तपासणी मोहिमेत एकूण 36 हजार प्रवाशांवर कारवाई करण्यात आली होती. त्यांच्याकडून दोन कोटी चार लाखांचा दंड वसूल करण्यात आला होता, असे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.