पुणे-नाशिक रस्त्यालगतची अतिक्रमणे हटविली

संगमनेर – संगमनेर शहरातील पुणे-नाशिक रस्त्यावर असलेली अतिक्रमणे हटविण्यास संगमनेर नगरपरिषदेने आजपासून सुरुवात केली. कोणतीही पूर्वसूचना न देता पालिकेने अतिक्रमणे काढण्यास प्रारंभ केल्याने अतिक्रमणधारकांची चांगलीच धावपळ उडाली होती.

शहरातून जाणाऱ्या पुणे-नाशिक रस्त्यावरील यशोधनपासून सुरू झालेल्या या मोहिमेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त देण्यात आला होता. मोहिमेबाबत कमालीची गुप्तता पाळली गेल्याने काही अतिक्रमणधारकांना संताप अनावर झाला होता. मात्र मोठ्या बंदोबस्तासमोर तो फारवेळ टिकला नाही. महामार्गाच्या कडेला असलेल्या अतिक्रमित टपऱ्या, दुकानांच्या समोरील पाल जेसीबी यंत्राच्या साह्याने उद्‌ध्वस्त केली. सकाळी दहावाजेपासून अतिक्रमण हटाव मोहिमेस सुरवात झाली. दिल्लीनाका परिसरात अतिक्रमणधारकांचा किरकोळ विरोध वगळता मोहीम सुरळीत पारपडली. काही व्यावसायिक व नागरिकांनी स्वत:हून अतिक्रमणे काढून घेतली. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

संगमनेरचे प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे, पोलीस उपअधीक्षक अशोक थोरात, तहसीलदार अमोल निकम, शहर पोलीस निरीक्षक अभय परमार, मुख्याधिकारी सचिन बांगर यांच्यासह पालिकेचे पन्नासाहून अधिक कर्मचारी, 30 पोलीस कर्मचारी, पाच महिला पोलीस कर्मचारी व वाहतूक शाखेचे पोलीस यात सहभागी झाले होते. पुणे-नाशिक रस्त्यालगत अतिक्रमण हटाओ मोहीम राबविण्यात आल्याने संपूर्ण महामार्गावर जागोजागी वाहतुकीची कोंडी झाली होती. उशीरा का होईना पण पालिकेला शहाणपण सुचल्याने सुज्ञ संगमनेरकरांनी समाधान व्यक्त केले असून, कारवाईत सातत्याच्या अपेक्षाही व्यक्त केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)