“जनगणना-2021’ची प्रशासकीय तयारी सुरू

शासनाकडून संनियंत्रण समितीची स्थापना : अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

पुणे – जनगणना -2021 चे कामकाज सुलभतेने व्हावे, तसेच जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांशी सक्रियरित्या समन्वय ठेवण्यासाठी शासनाने राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली 12 सदस्यीय सनियंत्रण आणि अंमलबजावणी समिती गठीत केली आहे.

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार जणगननेसाठी पुरविण्यात येणाऱ्या निधीचे वाटप जिल्हाधिकारी कार्यालये व महानगरपालिका यांना करणे, जनगणनेचे काम पूर्ण करण्यासाठी अधिकारी व कर्मचारी नियुक्तीसाठी राज्य शासनाकडून सूचना देण्यात येतात, त्यावर नियंत्रण ठेऊन त्याची अंमलबजावणी करणे समिती पाहणार आहे. समितीमध्ये सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव, याच विभागाचे उपसचिव, महसूल, शालेय शिक्षण आणि नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव, नगर विकास, ग्रामविकास व अर्थ विभागाचे प्रधान सचिव, वित्त विभागाचे सचिव, राज्य परिवहन मंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हे सदस्य असणार आहेत. तर जनगणना संचालनालय विभागाचे संचालक संयोजक म्हणून काम पाहणार आहेत. जनगणनेशी संबंधित कामाचा आढावा घेण्यासाठी तसेच रजिस्ट्रार जनरल व जनगणना आयुक्त, नवी दिल्ली यांनी केलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी या समितीची किमान महिन्यातून एकदा बैठक होणार आहे. सदर समिती कोणत्याही व्यक्तीस समितीचे सदस्य म्हणून निवड करू शकेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)