नवी दिल्ली – भाजपा नेते कैलाश विजयवर्गीय यांचे सुपुत्र आमदार आकाश विजयवर्गीय यांनी एका महापालिकेच्या अधिकाऱ्यास चक्क बॅटने मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याप्रकरणी आमदार आकाश यांना पोलिसांनी अटक झाली आहे. परंतु, आता आकाश विजयवर्गीय यांच्यानंतर त्यांचे वडील कैलाश विजयवर्गीय यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियामध्ये वेगाने व्हायरल होत आहे.
कैलास विजयवर्गीय यांचा तो फोटो २५ वर्ष जुना आहे. ११९४ साली कैलाश विजयवर्गीय इंदुरचे महापौर होते. आणि इंदुरमध्ये एका मुद्यावरून निदर्शने करत होते. त्यावेळी कैलाश विजयवर्गीय यांनी इंदुरच्या तत्कालीन एएसपी प्रमोद श्रीपाद फलनीकर यांच्यावर बुट उगारला होता. हाच फोटो आता व्हायरल होत आहे.
दरम्यान, इंदुर महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे एक पथक जुन्या व पडण्याची शक्यता असलेली घरं पाडण्यासाठी आले होते. त्यावेळी सुरूवातीस महापालिका अधिकारी व आकाश विजयवर्गीय यांच्यात वाद झाला. त्यानंतर संतापलेल्या आकाश यांनी बॅट घेऊन अधिकाऱ्यांना मारण्यास सुरूवात केली. हा सर्व प्रकार माध्यम प्रतिनिधींच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. आकाश यांच्या समर्थकांनी इंदुरमध्ये त्यांच्या सर्मथनार्थ पोस्टर लावण्यास सुरुवात केली आहे.