भाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले

निमगाव केतकी येथील सभेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची टीका

रेडा – भाजप सरकारने देशाची अर्थव्यवस्था चुकीची करून ठेवली आहे. भाजप सरकारने देशावर 82 लाख कोटीचे तर राज्यावर पाच लाख कोटीचे कर्ज करून ठेवले आहे. देश आर्थिक अडचणीत सापडला आहे, त्यामुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्र पक्षाच्या उमेदवारांना संधी द्यावी, असे आवाहन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहीर प्रचार सभेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार दत्तात्रय भरणे, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, सभापती अप्पासाहेब जगदाळे, सभापती प्रवीण माने, तालुकाध्यक्ष कृष्णाजी यादव, महारुद्र पाटील, ज.मा मोरे, दत्तात्रेय शेंडे, विलासराव वाघमोडे, अशोक घोगरे, प्रताप पाटील, राजेंद्र तांबिले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले की, मोदींनी सर्वच निर्णय चुकीचे घेतले आहेत. यातून विशेषत: ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था पूर्ण ढासळली आहे. देशात दोनच व्यक्ती कारभार चालवतात; त्यामुळे ग्राहक व उत्पादक यांचा विचार न करता बेतालपणे कारभार करून देशाची अर्थव्यवस्था भाजप सरकारने बेचिराख करून टाकली आहे. भाजप सरकार सत्तेवर येण्याअगोदर परदेशातून काळा पैसा आणणार होते, हा काळा पैसा आणला का? असा सवाल जनतेने विचारला पाहिजे. नोटाबंदी याच सरकारने केली, त्यामुळे आजही व्यवहार चालत नाहीत. याचा जाब राज्यातील व केंद्रातील भाजप सरकारला गावागावातून विचारला जात आहे. 45 वर्षात बेकारी नव्हती ती बेकारीची कुऱ्हाड आपल्या देशावर मोदी सरकारने आणून ठेवली आहे, त्यामुळे उद्योगपती गुंतवणूक करण्यास तयार नाहीत, असेही पवार यांनी सांगितले.

माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की, देशपातळीवर राज्यपातळीवर कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्र पक्षांची आघाडी झाल्याने आघाडीचा धर्म पाळण्यासाठी आम्ही एकदिलाने काम करीत आहोत. कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार एकत्र असताना ज्या जनतेला सुख सुविधा मिळाल्या त्या आता बंद झाल्या आहेत. आमदार दत्तात्रय भरणे म्हणाले की, इंदापूर तालुक्‍यातील जनता ही विकासाला प्राधान्य देणारी आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन पक्षांच्या माध्यमातूनच इंदापूर तालुक्‍याचा कायापालट झाला आहे. तालुक्‍यातील जनता आपल्या विचाराची आहे. त्यामुळे कोणीही काहीही अफवा पसरू द्या, चुकीच्या गोष्टीला खतपाणी घालू नका, असे आवाहन भरणे यांनी केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)