पिंपरी – ऑफिसचे काम संपवून घरी निघालेल्या दुचाकीस्वाराला बसने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि.8) रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास चिंचवड येथील वाल्हेकरवाडी परिसरातील गुरुकृपा प्रिंटर्स समोरील रस्त्यावर घडली. शंकर बाळासाहे बोंगार्डे असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.
याप्रकरणी आनंदा दादू मांगले यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, बसचालक भगवान बन्सीलाल पाटील (वय 43 , रा. शिवनगरी, बिजलीनगर, चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री बाराच्या सुमारास शंकर नेहमीप्रमाणे आपल्या ऑफिसचे काम संपवून दुचाकीने (क्र.एमएच 14/सीई/2594) घरी निघाले होते.
दरम्यान वाल्हेकरवाडी येथील गुरुकृपा प्रिंटर्स समोरील रोडवर आल्यानंतर भरधाव वेगात आलेल्या बस (क्र. एमएच/ 14/जीडी/6765) ने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. यामध्ये शंकर याचा मृत्यू झाला. याप्रकरणात बसचालक भगवान याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कांबळे करीत आहेत.