श्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील शोपियॉं येथे शुक्रवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात असून दहशतवाद्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात जवानांना यश आले आहे.
शोपियॉं जिल्ह्यातील गावात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. यानुसार सुरक्षा दलांनी शुक्रवारी पहाटे परिसरात शोधमोहीम राबवायला सुरुवात केली. या मोहिमेवेळी परिसराला वेढा देण्यात आला. यादरम्यान झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला.
शोपियॉंतील अमशीपोरा येथे ही चकमक झाली असून चकमकीत ठार झालेला दहशतवादी हा इसिसचा जम्मू-काश्मीरमधील टॉप कमांडर होता. इश्फाक अहमद सोफी उर्फ अब्दुल्ला भाई असे या दहशतवाद्याचे नाव आहे. इश्फाक हा इसिसचा जम्मू-काश्मीरमधील एकमेव कमांडर होता. त्याचा खात्मा झाल्याने इस्लामिक स्टेट ऑफ जम्मू-काश्मीर या दहशतवादी संघटनेला मोठा हादरा बसला आहे.
इश्फाक सोफी हा 2015 मध्ये हरकुतूल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेत सामील झाला होता. यानंतर 2016 मध्ये तो इस्लामिक स्टेट ऑफ जम्मू-काश्मीर या संघटनेत सामील झाला होता. तो आयएसजेके टॉप कमांडर होता.