स्व. पी. डी. पाटील : उत्तुंग व्यक्तिमत्व

पी. डी. या दोन शब्दातच विलक्षण जादू आहे. या दोन शब्दांनी ते सर्वांना सुपरिचित आहेत. कराडच्या सर्वांगिण सार्वजनिक जीवनाशी एकरूप झालेले हे एक भव्यदिव्य व अलौकिक व्यक्‍तिमत्त्व.

1 जुलै 1918 रोजी एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मास आलेले कराडच्या टिळक हायस्कूलमध्ये त्यांचे माध्यमिक शिक्षण पूर्ण करून कोल्हापूर येथून कायद्याचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी 1943 साली कराडमध्ये वकिली व्यवसायास सुरूवात केली. 1952 मध्ये त्यांनी सार्वजनिक जीवनात प्रवेश केला. सर्वप्रथम नगरसेवक म्हणून निवडून आले व 41 वर्षे सतत नगराध्यक्ष पदाची धुरा यशस्वीरित्या सांभाळली. म्हणूनच गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डससमध्ये त्यांचे नाव सुवर्णाक्षराने नोंदविले गेले आहे. त्यांची जयंती, वाढदिवस हा वैयक्‍तिक, कौटुंबिक पातळीवर न राहता संपूर्ण कराडमय साजरा होतो. कराड नगरीचे आधुनिक शिल्पकार, कराडचे आजचे भव्यदिव्य नेत्रदिपक स्वरूप दिसते त्याचा पाया पी. डी.नी घातला. कराड व पी. डी. हे एकरूप झालेले समीकरण होय. त्यांची ही परंपरा नवीन युवा पिढी चालवित आहे. त्यांनी लावलेले छोटेसे रोपटे त्याचे रूपांतर एका भव्य वटवृक्षात झाले आहे. 2018 साली सुंदर, स्वच्छ कराड हे भारतातील अग्रणी व एक नंबरचे शहर ठरले. त्याची मुहूर्तमेढ पी. डी. साहेबांनी रोवली असून त्याची फळे आता पहावयास मिळत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कराड नगर पालिकेवर प्रदीर्घ काळ नगराध्यक्ष पदावर कार्यरत राहिल्याने कराडचा सर्वांगिण विकास साधण्यात ते यशस्वी झाले. नगरपालिकेचा कारभार करताना त्यांनी एक नवा विचार, संकल्पना मांडली. नवीन आचारसंहिता संपूर्ण महाराष्ट्रात रूजवली ती अशी. स्थानिक संस्थेत राजकारण, जात, धर्म, पक्ष, पथ, गटबाजी, झुंडशाही, दडपशाही इ. न जुमानता नागरी प्रश्‍नांसाठी नगरपालिका हा नवा विचार नवा मंत्र व सिद्धांत त्यांनी सर्व प्रथम मांडला व प्रत्यक्षात आणून त्यांनी यशस्वी केला आहे.

कराड शहरातील स्थानिक पातळीवर रस्ता रूंदीकरण, पक्की सिमेंटची गटारे, सुसज्जित नगर परिषदेची इमारत, शिवाजी मार्केट, सुपर मार्केट, न्यायालय इमारत, स्मशानभूमीची नवीन वास्तू, संपूर्ण महाराष्ट्रात सर्वप्रथम भुयारी गटाराची योजना, जलनि:स्सारण योजना, शुद्ध, निर्जंतूक पाणी पुरवठा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने सन्मानित कराड नगरपालिका सार्वजनिक ग्रंथालय, यशवंतराव चव्हाण स्मृती सदनात भव्य व वातानुकुलित नाट्यगृह, कलादालन, स्व. यशवंतराव चव्हाण यांचे विरंगुळा निवासस्थानात संग्रहालयाची कल्पना त्यांचीच. स्व. वेणूताई चव्हाण ट्रस्ट स्थापन करून विश्‍वस्त म्हणून शेवटपर्यंत कार्यरत होते. स्टेडियम परिसरात कुस्ती संकुलन उभारले. सह्याद्रि साखर कारखाना उभारून कृषि क्षेत्रास आर्थिक पाठबळ देवून त्यांनी शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले.

पी. डी. पाटील हे केवळ एक व्यक्‍ती नसून वैचारिक अधिष्ठान असलेली संस्था, चळवळ आहे. म्हणूनच त्यांनी पी. डी. पाटील प्रतिष्ठानाद्वारे अनेक सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक प्रकल्प यशस्वीरित्या राबविले. दरवर्षी 12 मार्च रोजी या प्रतिष्ठानमार्फत एकसूर-एक ताल हा उपक्रम अखंडपणे चालविला जात आहे. सुंदर स्वच्छ शाळा उपक्रमातही सातत्य ठेवण्यात आले आहे. पी. डी. पाटील उद्यानात हवाई दलाचे विमान, रणगाडे आदी ठेवण्यात येणार आहेत. त्यांच्या नावे पी. डी. पाटील उद्यानात सांस्कृतिक भवन उभारले आहे. त्याचा उपयोग सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे व्हावा. तेथे योग-प्रशिक्षण, ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्यालय आदी मोफत कार्यक्रम व्हावेत हीच त्यांना आदरांजली ठरेल!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)