पुणे- आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी पुरंदर तालुक्यात पाच जागांचे सर्वेक्षण करून यातील सध्या प्रस्तावित केलेली सात गावांमधील जागा निश्चित केली आहे.
मात्र, भूसंपादन सोयीस्कर व्हावे, यासाठी उर्वरित चार जागांची संरक्षण विभाग, एअरपोर्ट ऍथॉरिटी ऑफ इंडिया आणि हवाई दल यांनी संयुक्तपणे पाहणी केली आहे. विमानतळासाठी पर्यायी चार जागांच्या तपासणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच याबाबतचा अहवाल राज्य शासनाकडे सादर करण्यात येणार आहे.
पुरंदर येथे विमानतळ उभारण्यासाठी सात गावांमधील सुमारे 2,832 हेक्टर जागेची आवश्यकता आहे. विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील पाच जागांची पाहणी करून क्रमांक एकची जागा विमानतळासाठी योग्य आहे. या जागेला सर्व प्रमुख विभागांची मान्यता मिळालेली आहे. संरक्षण विभाग आणि हवाई दल यांनीसुद्धा या जागेला मान्यता दिलेली आहे.
तसेच सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. भूसंपादन सुरू करण्यापूर्वी निश्चित केलेल्या जागेसह अन्य पर्याय जागेंची पुन्हा एकदा हवाई दल आणि संरक्षण विभागांकडून तपासणी करून घ्यावी. तसेच भूसंपादन सुरू करण्यापूर्वी प्रशासनाने मोबदल्यासंदर्भात जे चार पर्याय सुचवले आहेत, त्या पर्यायांचा फेरआढावा घेण्यात यावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार उर्वरित चार जागांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या दोन ते तीन दिवसात या बाबतचा अहवाल प्राप्त होणार आहे.