लाहोर : करोनामुळे जगातील अर्थव्यवस्था काही प्रमाणात ठप्प झाली आहे. जवळपास जगातील सर्वच देश याचा सामना करत असून यातून उभरण्याचा प्रयत्न करत आहेत. करोनामुळे आपल्या शेजारी असलेल्या पाकिस्तानचीही अवस्था काही चांगली नाही. दिवसेंदिवस इथली परिस्थिती भयावह होत चालली आहे. त्याचधर्तीवर सार्ककडे करोनाच्या नावावर पैसे मागणाऱ्या पाकिस्तानने जागतिक समुदयासमोरही हात पसरले असून आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे. आम्हाला आर्थिक मदत करा अन्यथा भूकबळी जातील असेही त्यांनी म्हटले आहे.
लॉकडाऊनमुळे देशभरात सर्व व्यवसाय बंद पडल्यामुळे आता पाकिस्तानात उपासमारीची समस्या निर्माण झाली आहे. रविवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जगाला आणि देशाला आवाहन करणारा एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर कर केला आहे. त्यामध्ये ते म्हणालेत की, अंतरराष्ट्रीय समुदाय, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आणि अंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था यांना माझं आवाहन आहे की, या संकटाच्या काळात पाकिस्तानसारख्या कर्जबाजारी देशांसाठी काही तरी ठोस मोहीम राबवावी. या मोहिमेअंतर्गत विकसनशील देशांचे कर्ज माफ करण्यात यावं.
दरम्यान, इम्रान खान यांचे हे आवाहन म्हणजे करोनाच्या निमित्ताने देशावर असणारे कर्ज माफ करण्याची मोहीम आहे असे मानले जात आहे. तसेच पाकिस्तानसारख्या कर्जबाजारी देशांची अर्थव्यवस्था करोनाच्या महामारीचा सामना करण्याइतकी बळकट नाही. जगभरातील मोठ्या संस्थांनी अशा कर्जबाजारी विकसनशील देशांना मदत करण्यासाठी पुढे यावं. तसेच त्यांच्यावर असणारे कर्ज माफ करावं. असे म्हटले आहे. आता इम्रान खान यांनी जागतिक समुदायाला मदतीचे आवाहन केले आहे. तसेच पाकिस्तानला तातडीने आर्थिक मदत केली नाही तर करोनाआधीच उपासमारिने लोकांचा मृत्यू जाईल असे म्हटले आहे.