चिंचवड – फाईव्ह फेज प्रणालीमध्ये बाधितांच्या संक्रमित विभागाचा ग्राफिक आराखडा तयार करून हॉटस्पॉट झोन ते लोअर स्प्रेड स्पॉट झोन असे वर्गीकरण करण्यात यावे. त्यानुसार टप्प्याटप्प्याने लॉकडाउन हटवावे. तरच करोना लढ्याविरुद्ध विजय मिळवणे शक्य होणार आहे. असे मत प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांनी व्यक्त केले.
पाटील म्हणाले, राज्यातील करोनाबाधितांची संख्या 1750 च्या वर गेलेली आहे. सर्वात धोकादायक म्हणजे पुणे आणि मुंबई या दोन्ही शहरांतील बाधितांची संख्या दररोज वाढत आहे. सध्या तपासणी करीत असलेल्या रुग्णांमध्ये कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळून येत नाहीत. अशा सायलेंट कॅरिअर रुग्णांमुळे करोना बाधितांची संख्या वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नागरिकांची जीवितहानी टाळण्यासाठी आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी नियमांची कडक अंमलबजावणी करावी. त्याशिवाय करोना लढा जिंकता येणार नाही. करोनावर आणखी लस विकसीत झाली नाही. त्यासाठी सद्यस्थितीत लॉकडाउन हेच प्रभावी अस्त्र ठरणार आहे. घरी बसणे हेच यावरील रामबाण उपाय आहे. तेव्हाच आपण टप्प्याटप्याने म्हणजेच फाईव्ह फेज प्रणाली वापरूनच लॉकडाउन हटवू शकतो. अन्यथा राज्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. तेव्हा नागरिकांनी नियमांचे पालन करावे.