सातारा – भाजपला रामराम करून राष्ट्रवादीत प्रवेश करणारे दीपक पवार यांनी शुक्रवारी जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे सादर केला. दीपक पवार रविवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. आगामी विधानसभेची निवडणूकदेखील ते राष्ट्रवादीकडून लढण्याची शक्यता असल्यामुळे भविष्यात पक्षांतरबंदी कायद्याचे उल्लंघन होऊ नये, म्हणून पवार यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
अडीच वर्षापुर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पवार यांनी कुडाळ जिल्हा परिषद गटातून भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविली होती. त्या निवडणुकीत त्यांनी आ. शशिकांत शिंदे यांचे बंधू ऋषिकांत शिंदे यांचा पराभव केला होता. त्याचबरोबर त्यांनी 2014 ची सातारा- जावळी विधानसभेची निवडणूक भाजपकडून लढविली होती. त्या निवडणूकीत पराभव झाल्यानंतर त्यांनी मागील पाच वर्षात मतदारसंघात जोरदार बांधणी केली होती. मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर पवार यांचे प्रतिस्पर्धी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे साहजिकच पवार यांची उमेदवारी डावलली गेली. परिणामी पवार यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे त्यांनी जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला.