मोठे भाडे देण्याचे आमिष; पोलिसांकडे तक्रार करण्याचे आवाहन
सातारा – मोबाइल टॉवरसाठी जागा दया, भरघोस उत्पन्न मिळण्याची संधी आहे, असा फोन आल्यास तत्काळ सावध व्हा. 25 हजार रुपये भाडे देण्याचे आमिष दाखवून एका महिलेकडून लोकांची फसवणूक केली जात आहे.
एका महिलेकडून कागदपत्रे, नंतर पाचशे रुपयांची मागणी, दोन फोटो, पॅनकार्ड, आधार कार्ड, बॅंक ऑफ बडोदातील 55500010000537 हा खाते क्रमांक दिला जातो. पाचशे रुपये भरल्यावर रिसीटची मागणी केली जाते. त्यानंतर वारंवार रकमेची मागणी होते. असे होत असेल तर वेळीच सावध व्हा, असे आवाहन जिल्हा पोलीस दलाच्या सायबर विभागाने व आर्थिक गुन्हे शाखेने केले आहे. पश्चिम महाराष्ट्रात अशा प्रकारचे येणारे कॉल शक्यतो उत्तर प्रदेश व बिहारमधून येतात. सातारा जिल्ह्यात झटपट पैसा मिळवण्याचा मार्ग दाखवणाऱ्या फसव्या कॉलमुळे लोकांची फसवणूक झाल्याची अनेक प्रकरणे झाली असली तरी तक्रारदार पुढे येत नाहीत, असे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी दिली.
या संदर्भात जिओ कंपनीचे कायदेविषयक सल्लागार ऍड. मोहसीन इनामदार यांच्याशी ‘प्रभात’ने संपर्क साधला असता, ते म्हणाले, कंपनीकडून असे कोणतेही टॉवर दिले जात नाहीत. अशा फसवणुकीच्या तक्रारी आमच्यापर्यंत नेहमीच येतात. कंपनीकडून पोलिसांकडे तक्रार झाली असली तरी फसवणूक झालेल्या व्यक्तींनी पुराव्यांसह तक्रार दाखल केल्यास थेट कारवाईला बळकटी मिळू शकते.
सातारा जिल्ह्यात टॉवर देण्याच्या आमिषाने अनेकांची फसवणूक झाल्याचे काही मोबाइल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, पुराव्याअभावी आम्ही काहीच करू शकत नाही, असे इनामदार यांनी स्पष्ट केले. फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचे नाव अंजना महातो असे असून तिचा मोबाइल नंबर 8181866069, 7456804239 आहे. संबंधित व्यक्तीचा कॉल आल्यास पोलिसांशी तत्काळ संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
फसवणूक टाळण्यासाठी हे करा
कॉल आल्यास पुराव्यासाठी कॉल रेकॉर्ड करून तक्रार करा. फेक कॉलकडे दुर्लक्ष करा आणि पिन नंबर व बॅंक खात्यांचा तपशील कोणालाही सांगू नका.