Zika Virus Detection : कर्नाटकात पुन्हा एकदा व्हायरसची एंट्री झाल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यातील चिक्कबल्लापुरा जिल्ह्यात झिका विषाणू आढळल्यानंतर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. चिक्कबल्लापुरा जिल्ह्यातील शिदलघट्टा तालुक्यातील तलकायलाबेट्टा गावामध्ये झिका विषाणू आढळून आल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
कर्नाटकातील तलकायलबेट्टा गावात हा विषाणू आढळून आल्यानंतर गावाच्या आजूबाजूचा म्हणजेच पाच किलोमीटरच्या परिघात येणारी सर्व गावे कंटेनमेंट झोन (CZ) म्हणून घोषित करण्यात आली आहेत. त्यासोबतच झिका विषाणूच्या संसर्गाची लक्षणे अजून तरी अन्य कोणामध्ये आढळून आली नाहीत. तालयलाबेट्टा गावात सुमारे ५ हजार लोकसंख्या असून त्याठिकाणच्या गर्भवती महिलांसाठी विशेष काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आला आहे.
झिका विषाणूचे रुग्ण आढळल्यानंतर कर्नाटक आरोग्य विभागाने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला पत्र लिहिले आहे. झिका विषाणू आढळल्यानंतर आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सरकारने पत्रात म्हटले आहे. त्यासोबतच”निरीक्षणासाठी ५ किमीचा परिसर कंटेनमेंट झोन (सीझेड) म्हणून घोषित करण्यात आला आहे. गरोदर महिलांचे नमुने सीरम नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, बेंगळुरू येथे सादर करण्यात आले आहेत. बाधित गावात पायरेथ्रम (2%) . घरातील जागेवर फवारणी केली जात आहे.”
चिक्कबेलापुराचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी महेश यांनी झिका विषाणूचा प्रसार कसा होतो आणि त्याचा मानवी शरीरावर होणारा परिणाम याविषयी माहिती दिली आहे. ते म्हणाले, “झीका विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर, तो मेंदूमध्ये पसरतो आणि मायक्रोसेफली नावाची गंभीर समस्या निर्माण करतो. हा विषाणू मुख्यतः मुलांमध्ये पसरतो. अशा मुलांचा मेंदू कमकुवत होईल आणि त्यामुळे त्यांना ऑटिझमचा त्रास होऊन, बळी जाण्याची शक्यता आहे.दरम्यान, ” हे लक्षात घेण्यासारखे आहे की झिका विषाणूची लागण झालेल्या लोकांना कोणतेही विशेष उपचार किंवा लस दिली जात नाही. डासांपासून स्वतःचे संरक्षण करणे हाच उत्तम उपाय असल्याचे जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.