शरद पवारांच्या स्वागताला तरूणाईची झुंबड; साताऱ्यात विरोधकांना धडकी

राष्ट्रवादीच्या विराट रॅलीने साताऱ्यात विरोधकांना धडकी

सातारा: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ढासळू लागलेल्या बालेकिल्ल्यात, सातारा येथे रविवारी जोशपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. साताऱ्याच्या दोन्ही राजेंशिवाय पवारांचा हा पहिलाच सातारा दौरा असतानाही त्यांच्या स्वागताला तरुणाईची झुंबड उडाली होती. हजारो तरुणांच्या उपस्थितीत झालेल्या या भव्य स्वागतामुळे जिल्ह्यात पवारांचीच क्रेझ अजूनही टिकून असल्याचे अनुभवायला मिळाले. या रॅलीमुळे पवारांच्या आणि राष्ट्रवादीच्या विरोधकांना चांगलीच धडकी भरली आहे.

रयत शिक्षण संस्थेत पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम पार पडल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने रयत शिक्षण संस्था, पोवई नाका, जिल्हाधिकारी कार्यालय, बॉम्बे रेस्टॉरंट ते कल्याण रिसॉर्ट अशी रॅलीचे काढण्यात आली. या वयातही आपल्या लाडक्‍या नेत्याचा सळसळता उत्साह पाहण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून आलेले हजारो तरुण व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले होते. “शरद पवारसाहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, “टायगर अभी जिंदा है’ अशा घोषणा देत या युवकांनी रॅली मार्गाचा परिसर दणाणून सोडला. या रॅलीमुळे साताऱ्यातील वातावरण राष्ट्रवादीमय झाल्याचे पाहायला मिळाले.

कर्मवीर जयंतीचा कार्यक्रम झाल्यानंतर जिल्ह्यातून आलेले हजारो युवक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात शरद पवार यांची वाट पाहत होते. शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केल्यावर शरद पवार हे सिक्‍कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील यांच्यासमवेत दुपारी दोन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पोहोचले. तेथे तरुणाईचा जोश पाहून सारेच नेते सुखावले. युवा वर्गात पवार यांची क्रेझ आजही असल्याचे दिसून आले. युवकांनी पवार यांना सुमारे अर्धा तास घातलेला गराडा पाहून सुरक्षारक्षकांची पळापळ झाली.

मात्र, पवार यांनी त्यांना इशारा करून थांबवले. हे तरुण म्हणजे माझ्या राज्याचे भविष्य आहेत, असे पवार यांनी सांगताच पुन्हा घोषणांचा गजर झाला. त्यानंतर शरद पवार जिप्सी गाडीत बसल्यानंतर रॅली पुढे मार्गस्थ झाली. रॅलीत सुमारे पाच हजार युवक दुचाक्‍यांवरून सहभागी झाले होते. सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद आताही फारशी कमी झाली नसल्याचे या गर्दीने दाखवून दिले. शरद पवार यांच्या रॅलीपूर्वी शेकडो युवकांनी सातारा शहरात पोवई नाका, राजपथ, राजवाडा या मार्गाने रॅली काढून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मेळाव्यासाठी वातावरणनिर्मिती केली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here