संजीवराजे यांचे सूचक विधान
सातारा: ”राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याला मी आलो आहे, म्हणजे समजून घ्या,’ असे सूचक विधान जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी करुन विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच असण्याचे संकेत दिले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सातारा येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. संजीवराजे हे रामराजे यांचे बंधू आहेत. रामराजेंचे समर्थक व फलटणचे आमदार दीपक चव्हाण ही त्यांच्यासमवेत होते. त्यापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यक्रमस्थळापर्यंत रँली काढून मोठे शक्तीप्रदर्शन केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या उदयनराजे भोसले व शिवेंद्रसिंहराजें भोसले यांच्या होम पीचवर सातारा शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील नेत्यांनी मोठी ताकद दाखवली. पवार यांची रँली व मेळाव्याला प्रचंड गर्दी झाली आहे.