खटाव – नुकतेच खटाव ता. खटाव येथील इतिहास अभ्यासक कुमार गुरव यांनी दक्षिणेतील गडकोटांची अभ्यास मोहीम यशस्वी केली. त्यात या युवकांने किल्ल्यावरील अन्य शिल्पांचा शोध घेतला. तेव्हा पहिल्या अन् दुसऱ्या प्रवेशद्वाराच्या मध्यभागी असलेल्या पहारेकऱ्यांच्या देवड्यांच्या भिंतीवर एक शिलालेख आढळून आला. युवकांनी शोधलेला हा शिलालेख देवनागरी लिपीत आहे. तो चार ओळींचा आहे. त्यातील मजकूरानुसार रवळोजी जाधव यांची गडावर सरदार म्हणून नेमणूक करण्यात आली असल्याचे स्पष्ट होते.
या शिलालेखाभोवती काटेरी झुडपे वाढली होती. आजूबाजूला मोठ्या प्रमाणात मातीही होती. दोन- तीन तासानंतरच्या सफाईनंतर तो शिलालेख वाचण्यायोग्य झाला. त्याचे वाचन करून तो शिलालेख अभ्यासकांना पाठवण्यात आला. शिवशाहीत तामिळनाडूमधील वेलूर प्रांतातील 25 किल्ले शिवरायांच्या ताब्यात होते.
त्यात साजरागड अन् गोजरागड या किल्ल्यांचा समावेश आहे. हे किल्ले सध्या अर्काट जिल्ह्यात आहेत.तत्पूर्वी त्यातील साजरागड या किल्ल्यावर काही वर्षांपूर्वी पुसेगाव (ता. खटाव) येथील अनिकेत वाघ या इतिहास अभ्यासक असलेल्या युवकास छत्रपती शिवरायांचे शिल्प आढळले होते. इतिहासाचे अभ्यासक अनिल दुधाणे, अनिकेत वाघ यांनी या शिलालेखातील मजकूर स्पष्ट केला.
‘जिज्ञासा मंच’चे नीलेश पंडित , प्रवीण भोसले यांचेही या शिलालेखाबाबत महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. ही शोध मोहिम कुमार गुरव खटाव , सूरज नाळे (जाधववाडी, ता. कोरेगाव), नीलेश सुतार (झगलवाडी, ता. खंडाळा) आदी युवकांनी यशस्वी केली.