वडगाव मावळ – तळेगाव दाभाडे शहरात म्हाडाकडून उभारण्यात येत असलेल्या प्रकल्पातील सदनिकाधारकांना प्रत्यक्ष ताबा मिळावा व आकारण्यात आलेली वाढीव रक्कम रद्द करावी, अशी मागणी आमदार सुनील शेळके यांनी नागपूर येथे सुरु असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान औचित्याचा मुद्याद्वारक उपस्थित करुन राज्य सरकारचे लक्ष वेधले.
तळेगाव दाभाडे शहरातील म्हाडाच्या प्रकल्पाची २०१८ ते २०२१ या काळात लॉटरी पद्धतीने सोडत काढण्यात आली होती. यावेळी देण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये प्रत्येक सदनिकेची किंमत सुमारे १३ लाख ९८ हजार इतकी होती. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अडीच लाख इतके अनुदान देण्यात येते. अनुदान वजा करुन या प्रकल्पातील सदनिकेची किंमत ११ लाख ४८ हजार रुपये होते. या प्रकल्पातील सदनिकेसाठी ७३० नागरिक पात्र ठरले. या सदनिकांचा ताबा मिळण्यासाठी ५८८ सदनिकाधारकांनी मुदतीनुसार नव्वद रक्कम भरली आहे. प्रकल्प पूर्ण करण्यास म्हाडाकडूनच तीन वर्षांचा विलंब झाल्याचे दिसत असून आजपर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण झालेले नाही. प्रकल्पास झालेल्या विलंबामुळे पात्र लाभार्थ्यांना २ लाख ५२ हजार इतकी वाढीव अतिरिक्त रक्कम भरा असे म्हाडाने सांगितले.
सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांची यामध्ये काही चुक नसताना त्यांना विनाकारण भुर्दंड सहन करावा लागत आहे. २६ ऑक्टोबर २०२३ रोजी पुणे येथे आमदार शेळके, संबंधित विभागाचे अधिकारी व सदनिकाधारक यांची संयुक्त बैठक संपन्न झाली. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर पात्र लाभार्थ्यांना सदनिकांचा ताबा देऊ व वाढीव आकारलेली रक्कम रद्द करु, असे आश्वासित करण्यात आले होते. परंतु बैठकीनंतर आजतागायत कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे आमदार शेळके यांनी सांगितले. तसेच घरांचा ताबा न मिळाल्याने सर्व लाभार्थी घरासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरत आहेत तसेच त्यांना घरभाडे देखील द्यावे लागत असल्याने त्यांचे दुहेरी आर्थिक नुकसान होत आहे याकडे औचित्याच्या मुद्द्यांद्वारे आमदार शेळके यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या हक्काचे घर मिळाले पाहिजे. म्हाडाकडून आकारण्यात येणारे अतिरिक्त वाढीव शुल्क रद्द करावे आणि लवकरात लवकर घराचा ताबा त्यांना द्यावा अशी मागणी अधिवेशनात केली आहे. लवकरच यावर योग्य निर्णय होईल अशी आशा आहे.
– आमदार सुनील शेळके
मागील पाच वर्षांपासून आम्ही स्वप्नातील घर मिळावे यासाठी आम्ही न्यायाच्या प्रतिक्षेत आहोत. आमदार सुनिल शेळके यांनी आमची बाजु मांडून याबाबत आवाज उठवला याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.
– ईश्वर पाटील (सदनिकाधारक)