युवा नेते “उदयदादा’ही युवकांच्या भेटीला

सुनीता शिंदे
सद्‌गुरू गाडगे महाराज महाविद्यालयात आज संवाद तरूणाईचा

कराड  – श्रीमंत छ. खा. उदयनराजे भोसले, खा. अमोल कोल्हे व माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी महाविद्यालयीन युवकांना लक्ष करून त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्या मनात जागा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. युवकांकडूनही त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हाच धागा पकडत कराड दक्षिणमधील युवा नेतृत्व असणाऱ्या जिल्हा परिषद सदस्य ऍड. उदयसिंह पाटील हेही युवकांशी बुधवारी सद्‌गुरू गाडगे महाराज महाविद्यालयातील युवक-युवतींशी संवाद साधणार आहेत. यावेळी शिक्षण, कृषी, स्वयंरोजगार व विकास या विषयांवर ते चर्चा करणार आहेत. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर युवकांना ते सादही घालणार आहेत.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार श्रीमंत छ. खा. उदयनराजे भोसले यांनी प्रथमत: महाविद्यालयीन युवकांशी संवाद साधला. खा. भोसले यांची युवकांच्या मनात क्रेझ आहेच. ती आणखीनच बिंबवण्यासाठी संवाद कार्यक्रमाचा स्टंट करण्यात आला. त्यावेळी युवकांनी विचारलेल्या अनेक प्रश्‍नांना खा. भोसले यांनी दिलखुलासपणे उत्तरेही दिली होती. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेच्या अनुषंगाने राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक खा. अमोल कोल्हे यांनीही महाविद्यालयात जाऊन युवकांशी संवाद साधला. छ. संभाजी महाराज मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अमोल कोल्हे यांची युवा मनात वेगळीच प्रतिमा निर्माण झाली आहे. त्यामुळे खास त्यांना पाहण्यासाठी यावेळी आयोजित संवाद मेळाव्यास कराड शहर व तालुक्‍यातील युवा वर्गाने मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी युवकांनी राजकीय व सामाजिक विषयांवर विचारलेल्या प्रश्‍नांना खा. कोल्हे यांनी समर्पक उत्तरे दिली होती. त्यामुळे हाही मेळावा यशस्वी झाला होता.

येत्या महिनाभरात विधानसभा निवडणूका होत आहेत. त्या डोळ्यासमोर ठेवत सर्वच पक्षांच्या उमेदवारांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. प्रत्येक उमेदवारांनी नागरिकांच्या भेटीवर भर दिला आहे. मतदारांमध्ये जादा करून युवा वर्गाचा समावेश असल्याने त्यांच्याशी संवाद साधणे गरजेचे आहे. तसेच लोकसभा निवडणुकीप्रसंगी त्यांच्या मतदानाचा खूप मोठा परिणाम झाला होता. हा विचार करत कॉंग्रेसचे कराड दक्षिणमधील विधानसभेचे आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सद्‌गुरू गाडगे महाराज महाविद्यालयातील युवक-युवतींशी संवाद साधला.

यावेळी आ. चव्हाण यांनी विद्यार्थी दशेपासून मुख्यमंत्री पदापर्यंतचे विविध पैलू युवा वर्गासमोर उलगडले. त्यामध्ये त्यांनी आपण कसे घडलो, कराड शहरासाठी किती निधी दिला, त्यातून कोणती विकासकामे उभी करता आली, तसेच पुढे काय करणार याबाबत माहिती त्यांनी दिली. तसेच विद्यार्थ्यांना पोटापाण्यासाठी राजकारणात येणार असाल तर अजिबात येऊ नका, असा मौलिक संदेश देत आगामी काळात कराड शहराचा विकास करण्यासाठी पुन्हा एकदा संधी द्या. अशी सादही घातली. युवा वर्गात कॉंग्रेसची प्रतिमा चिरकाल टिकावी हाही त्यापाठीमागचा उद्देश होता.
या संवाद मेळाव्याला चारच दिवसांचा अवधी लोटतोय तोच माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांचे सुपूत्र व कराड दक्षिणमधून निवडणूक लढण्यास इच्छुक असणारे युवा नेते ऍड. उदयसिंह पाटील यांनीही युवकांशी संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे.

बुधवार, दि. 11 सप्टेंबर रोजी ते सद्‌गुरू गाडगे महाराज महाविद्यालयातील युवकांशी संवाद साधणार आहेत. यावेळी शिक्षण, कृषी, स्वयंरोजगार व विकास या प्रमुख मुद्द्यांवर ते चर्चा करणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी उदयसिंह पाटील यांनी आपली भूमिका उघड केली नसली तरी त्यांनीही नागरिकांच्या भेटीवर कराड दक्षिणमध्ये भर दिला आहे. रयत संघटनेच्या माध्यमातून त्यांनी युवकांची चांगली फळी निर्माण केली आहे. आता महाविद्यालयीन युवकांच्या मनात स्थान निर्माण करण्याचा ते प्रयत्न करत आहेत.

युवकांची नक्की कोणाला मिळणार साथ?

निवडणूका डोळ्यासमोर ठेवून सर्वच राजकीय नेतेमंडळी युवा वर्गाला लक्ष करू लागले आहेत. त्या अनुषंगाने महाविद्यालयाच्या पायऱ्याही झिजवत आहेत. शिक्षण संस्थांकडूनही त्यांना मेळाव्यासाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र ही युवा मंडळी नक्की कोणाला साथ देणार? ते आगामी विधानसभा निवडणूकीतच स्पष्ट होईल.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×