पुणे -प्रेमसंबंध तोडल्यामुळे आक्रमक झालेल्या एका तरुणाने भर रस्त्यात तरुणीवर कोयत्याने वार करत खुनाचा प्रयत्न केला. मात्र, नागरिक आणि स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी धाव घेत तरुणीचे प्राण वाचवले. हल्ला करणाऱ्या तरुणाला नागरिकांनी चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. दर्शना पवार खून प्रकरण ताजे असतानाच ही घटना घडल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. शंतनू लक्ष्मण जाधव (22, रा. डोंगरगाव, ता. मुळशी) असे हल्ला करणाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, विश्रामबाग पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
तरुणीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिच्याबरोबर असलेला तिचा मित्रही जखमी झाला आहे. तरुणी एका इस्टिट्यूटमध्ये इंटेरियर डिझायनिंगच्या प्रथम वर्षात शिक्षण घेते. कोथरूडमधील महाविद्यालयात बारावीच्या वर्गात शिक्षण घेत असताना तिचा शंतनूसोबत परिचय झाला होता. तो भेटण्यासाठी न आल्यास मारहाण करण्याबरोबर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत होता. मंगळवारी तरुणीची परीक्षा असल्यामुळे ती पीएमपी बसने टिळक रस्त्यावरील ग्राहकपेठ बसथांब्यावर उतरली.
रस्ता ओलांडून पुढे गेली तेव्हा शंतनू तिला समोर दिसला. त्याने जवळ येऊन तरुणीला बोलायचे असल्याचे सांगितले. मात्र, तरुणी पुढे चालत राहिली. त्याने तरुणीसोबत वाद घालण्यास सुरुवात करून शिवीगाळ केली. त्यामुळे तिने शेखर सगळगिरे या मित्राला बोलावून घेतले. तो दुचाकीवरून तेथे आला. तरुणी त्याकडे जात असताना, शंतनूने तिचा विनयभंग करत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यावेळी मित्र शेखरने त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता, त्याने शेखरवर कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली. यामुळे शेखर गाडी सोडून पळून गेला. यानंतर तरुणीने तेथून पळ काढला असता, त्याने बॅगेतील कोयता काढून तरुणीच्या डोक्यात वार केला. त्यावर ती घसरून पडली. तो आणखी वार करण्याचा प्रयत्न करतानाच तेथे उपस्थित नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
याप्रकरणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात फोफावल्याचं चित्र आहे. गुन्हेगारांवर कायद्याचा वचक राहिला नसल्याचं दिसतंय. विद्यार्थिनींवर दिवसाढवळ्या कोयत्यानं हल्ले होत आहेत. गृहमंत्र्यांनाही बहुधा राजकीय कलगीतुऱ्यातून कायदा व सुव्यव्यस्था हाताळण्यास वेळ मिळत नसावा. सुसंस्कृत म्हणून पूर्वापार ख्याती असलेलं पुणे इतकं हिंस्त्र झालेलं यापूर्वी कधीच पाहिलं नाही.”