जिल्हा परिषद सभेत मानकुमरे- दीपक पवारांच्यात कलगी तुरा
सातारा – कुडाळ जिल्हा परिषद गटातून विजयी झाल्याबद्दल सदस्य दीपक पवार यांचा विशेष सभेच्या सुरुवातीस सत्कार करण्यात आला. हा सत्कार स्वीकारताना दीपक पवार यांनी वसंतराव मानकुमरे यांच्यावर त्यांच्या नेहमीच्या स्टाईलने षटकार ठोकला. अध्यक्ष संजीवराजे यांच्याकडे बघत “बाबा.. तुम्हीच विचारा मानकुमरे राष्ट्रवादीचेच ना,’ असे दीपक पवार म्हणताच सभागृहात चांगलाच हशा पिकला.
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीचे दीपक पवार यांनी कुडाळ जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवत विजयश्री खेचून आणली. या विजयामुळे दीपक पवार यांचे राष्ट्रवादीत व सातारा -जावळी विधानसभा मतदारसंघात पुन्हा वजन वाढले. उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे राष्ट्रवादीचे असले तरी त्यांच्यावर भाजपचे आ. शिवेंद्रराजे यांचाच शिक्का असल्याचे बोलले जाते. विधानसभा निवडणुकीत मानकुमरे यांनी राष्ट्रवादीचे काम प्रामाणिकपणे केले नसल्याचा त्यांच्यावर आरोप होत आहे. अशी परिस्थिती असताना मानकुमरे यांच्यावर टीका करण्याची संधी मिळाल्यावर दीपक पवार यांनी ती संधी सोडली नाही.
कुडाळ गटातून निवडून आल्याबद्दल विशेष सभेत अध्यक्ष संजीवराजे, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, शिक्षण सभापती राजेश पवार, कृषी सभापती मनोज पवार, समाजकल्याण सभापती शिवाजी सर्वगौड, महिला व बालकल्याण सभापती वनिता गोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांच्या उपस्थितीत दीपक पवार यांचा सत्कार करण्यात आला.
सत्कार स्वीकारल्यानंतर दीपक पवार यांनी संजीवराजे यांच्याकडे बघत पवारांना टाकलेल्या गुगलीने सभागृहात जोरदार हशा पिकला. केंजळ येथील खाणीमुळे रस्ते खराब झाले असून ते दुरुस्त करण्याची गरज असल्याचे मानकुमरे म्हणताच पवार म्हणाले, “मानकुमरे भाऊ, तुम्ही आमदारांच्या जवळचे आहात, त्यांच्याकडूनच रस्ते करा.’
पवारांच्या या वाक्याने सभागृहात पुन्हा हशा झाला. आदर्शवत काम करणारे सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्ह्यातील अधिकारी यांना कै. यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने पुरस्कार द्यावा, अशी मागणी कोरेगाव पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ जगदाळे यांनी केली. या मागणीचे सदस्यांनी बाके वाजवून स्वागत केले. संजीवराजे यांनीही असा पुरस्कार देण्याबाबत जिल्हा परिषद पुढाकार घेईल असे सांगितले.