मुंबई – येस बँकेचे सह-संस्थापक राणा कपूर यांना कोर्टातून जामीन मिळाला आहे. राणा गेल्या चार वर्षांपासून तुरुंगात आहेत. राणा कपूर यांना 466.51 कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीप्रकरणी मुंबईतील विशेष न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला. आता चार वर्षांनंतर राणा कपूरचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ( yes bank co founder rana kapoor granted bail)
दरम्यान, अंमलबजावणी संचालनालयाने (ED) राणा कपूर यांना मार्च 2020 मध्ये मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली आणि त्यांच्यावर बँक फसवणुकीशी संबंधित आठ प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल केला. मात्र, आता राणा कपूर यांना सर्व प्रकरणांमध्ये जामीन मिळाला आहे.
राणा कपूर यांचे वकील राहुल अग्रवाल म्हणाले की, त्यांची लवकरात लवकर सुटका व्हावी यासाठी ते जामिनाची औपचारिकता पूर्ण करत आहेत. 466.51 कोटी रुपयांच्या सार्वजनिक निधीचा गैरवापर करण्यासाठी गुन्हेगारी कट, गुन्हेगारी विश्वासभंग आणि फसवणूक केल्याप्रकरणी कपूर आणि अवंथा ग्रुपचे प्रवर्तक गौतम थापर यांच्याविरुद्ध सीबीआय प्रकरणात न्यायालयाने जामीन मंजूर केला.