मुंबई – या वर्षाच्या शेवटी सप्टेंबरमध्ये नियोजित जागतिक महिला ब्लू वॉटर सेलिंग अर्थात सागरी नौकानयन मोहिम आयोजित करण्यात आली आहे. या मोहिमेच्या तयारीचा भाग म्हणून प्रशिक्षण मोहिमेचा समारोप बुधवारी मुंबईतील मार्वे येथे झाला.
भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या १२ महिला अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या चमूचे पुण्यातील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे कमांडंट लेफ्टनंट जनरल ए के रमेश यांनी स्वागत केले.
लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आर्मी ऍडव्हेंचर विंग आणि आर्मी एक्वा नोडल सेंटर यांच्या अंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे.
दिनांक २३ मार्च २४ रोजी मुंबईतील मार्वे येथून नेव्हल डिटेचमेंट, एंड्रोथ, लक्षद्वीप येथे प्रशिक्षण मोहीमेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. भारतीय लष्करातील सात, नौदलातील एक आणि हवाईदलाच्या चार अधिकार् यांसह तिन्ही सैन्यदलातील १२ शूर महिला योद्धांच्या पथकाने मुंबई-लक्षद्वीप-मुंबई नौकानयन मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली.
या चमूने नौकानयन करताना अथांग महासागर, वाऱ्याची बदलती स्थिती, उष्मा आणि उसळत्या पाण्याचा सामना केला. या ऐतिहासिक साहसी प्रवासाने २७ दिवसांच्या कालावधीत महिला खलाशांचा आत्मविश्वास वाढवला आणि परिक्रमा करण्याचे त्यांचे अंतिम उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्यांना चांगली सुरुवात करून दिली.
ही अशा प्रकारची पहिलीच ऐतिहासिक मोहीम भारताच्या सागरी वारशात एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड आहे. भौगोलिक आणि सांस्कृतिक अडथळे दूर करणे, कर्मचाऱ्यांमध्ये एकतेची भावना आणि सौहार्द वाढवणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.
या शूर महिला योद्ध्यांनी आतापर्यंत मोहिमा आणि नियमित प्रशिक्षण उपक्रमांच्या रूपात वैयक्तिकरित्या 6000 सागरी मैलांपेक्षा जास्त जलप्रवास प्रशिक्षण पूर्ण केले आहे.