निघोज – राज्यातील जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीचा मुख्य यात्रा उत्सव गुरुवारपासून मोठ्या उत्साहात सुरू झाला. दुपारी पाच वाजता बगाड गाड्यांची मिरवणूक काढण्यात आली. पहाटे देवीचे पुजारी सुनील गायखे यांच्या हस्ते विधीवत पूजा करण्यात आली. यावेळी दुणगुले बंधू यांनी महाआरती गायली. शेकडो महिला भगीनींच्या हस्ते महाआरती करण्यात आली. मळगंगा देवीच्या जयजयकाराने आसमंत निनादला होता.
नवसाला पावणारी देवी म्हणून मळगंगा मातेचा राज्यात महिमा असून सकाळी सहा ते दुपारी पाच वाजेपर्यंत 50 हजारांपेक्षा जास्त भाविकांनी देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला. पुणे व नगर जिल्ह्यातील मळगंगा देवीचे स्थान असलेल्या गावातील भाविक काठ्या व पालख्या घेऊन निघोजच्या देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने आले आहेत.
मळगंगा देवीची बगाडगाडा मिरवणूक हा मान लंके मंडळाला आहे. या बगाड गाड्यात बसून महिला भावीक देवीचा नवस पूर्ण करतात. दोन तासांच्या या बगाडगाडा मिरवणुकीत शेकडो महिला भगिनी नवस पूर्ण करीत आनंद घेतात. जय मल्हार मंडळाचे मार्गदर्शक बाबाजी लंके हे या बगाड गाड्याचे सारथ्य करतात. जय मल्हार देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष पोपटराव लंके, सचिव सचिन लंके व मंडळाचे ज्येष्ठ पदाधिकारी व सदस्य नियोजन करीत ही मिरवणूक लक्षवेधी करण्यासाठी अथक परिश्रम घेतात.
या बगाड गाड्याची मिरवणूक गुरुवारी दुपारी पाच वाजता सुरू झाली. साडेसहा वाजता ही मिरवणूक देवीच्या हेमांडपंथी बारवेजवळ गेल्यानंतर त्या ठिकाणी अंबिल वर्तविण्याचा कार्यक्रम महिला भाविकांनी पार पडला. एसटी बसस्थानक परिसराजवळ असणाऱ्या मळगंगा चित्र मंदिर परिसरात निघोज ग्रामस्थ यांच्या लोकसहभागातून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
लाखो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट, निघोज ग्रुप ग्रामपंचायत व ग्रामस्थ तसेच मुंबईकर मंडळ यांनी या सर्व कार्यक्रमाचे नियोजन केले. लवकर दर्शन मिळण्यासाठी दर्शन रांग तयार केली असून दुपारी एक वाजता दर्शन रांगेतून दर्शन घेत भाविकांनी मळगंगा मातेच्या जयजयकाराच्या घोषणा देत आनंद व्यक्त केला आहे.