पुणे -राज्य शासनाने पुणे विभागातील 32 तहसीलदारांच्या बदल्या केल्या आहेत. त्यानुसार मुळशी तहसीलदारपदी रणजित भोसले, बारामतीच्या तहसीलदारपदी गणेश शिंदे, पिंपरी-चिंचवडच्या तहसीलदारपदी अर्चना निकम यांची नियुक्ती केली आहे. याबाबतचे आदेश महसूल विभागाचे सहसचिव डॉ. माधव वीर यांनी काढले आहेत.
करोनाचे संकट, मागील वर्षी मुख्यमंत्र्यांनी बदल्यांना दिलेली स्थगिती आणि त्यानंतर राज्यात झालेले सत्तांतर यामुळे महसूल अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडल्या होत्या. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या बदल्या करण्यात येत आहेत. वेल्हा तहसीलदारपदी दिनेश पारगे, पुणे नागरी समुह तहसीलदारपदी सुनीता आसवले, विभागीय आयुक्त कार्यालय सर्वसाधारण शाखेच्या तहसीलदारपदी मनीषा कुलकर्णी, शेती महामंडळ येथे रुपाली रेडेकर, जिल्हा पुनर्वसन शाखेत तहसीलदारपदी संजय पाटील यांची नियुक्ती केली आहे.
काहींना विदर्भ, मराठवाड्याचा रस्ता
शासनाने यंदा बदल्या करताना जिल्ह्यातील अनेक तहसीलदारांना थेट गडचिरोली, औरंगाबाद, चंद्रपूर, अमरावती या जिल्ह्यात पाठविले आहे. मावळचे तहसीलदार मधुसुदन बर्गे यांची बदली धानोरा (जि.गडचिरोली) येथे करण्यात आली आहे. मुळशीचे अभय चव्हाण यांची शिरुर कासार (जि.औरंगाबाद), वेल्ह्याचे तहसीलदार शिवाजी शिंदे यांची बदली चंद्रपूर जिल्ह्यात, बालाजी सोमवंशी यांची बदली नागपूर जिल्ह्यात, आंबेगावच्या तहसीलदार रमा जोशी यांची बदली अमरावती जिल्ह्यात, तर बारामतीचे तहसीलदार विजय पाटील यांची बदली चंद्रपूर जिल्ह्यात करण्यात आली आहे.