माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, शरद पवार यांची उपस्थिती
कराड – महाराष्ट्राचे थोर विचारवंत, माजी मंत्री यशवंतराव मोहिते (भाऊ) यांचे 7 नोव्हेंबर 2019-2020 हे जन्मशताब्दी वर्ष आहे. भाऊंनी आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोठे योगदान दिले आहे. त्यांनी विधीमंडळात केलेल्या कार्याची राज्याच्या पटलावर नोंद आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून आज गुरुवारी जन्मशताब्दी कार्यगौरव सोहळा रेठरे खुर्द येथील भारती विद्यापीठ, जाई मोहिते प्रशालेच्या प्रांगणात सकाळी 11.30 वाजता होत आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राष्ट्रपती महामहीम प्रतिभाताई पाटील आहेत. तर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
यावेळी भाऊंच्या जीवनकार्यावर अधारित आमचे भाऊ, घणाघात व जन्मशताब्दी स्मरणिका तसेच चित्रफितीचे प्रकाशन होणार आहे.
कार्यक्रमास माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खा. श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री आ. अशोकराव चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, आ. अजितदादा पवार, दिलीप वळसे-पाटील, माजी मंत्री गणपतराव देशमुख, विलासराव पाटील-उंडाळकर, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष
आ. बाळासाहेब थोरात आदींसह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याचे विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निबांळकर, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, माजी अर्थमंत्री आ. जयंत पाटील, आ. बाळासाहेब पाटील, आ. विश्वजित कदम, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, हर्षवर्धन पाटील, आ. सतेज उर्फ बंटी पाटील आदी मान्यवर निमंत्रक आहेत. सदरच्या सोहळ्यास सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. इंद्रजीत मोहिते यांनी केले आहे.