बारामती – धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (एस.टी. प्रवर्ग) आरक्षणासह मेंढपाळ नुकसान भरपाई व संरक्षण कायदा निर्मिती यांसह प्रलंबित मागण्यांसाठी बी. के. कोकरे प्रणित यशवंत सेनेच्यावतीने मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांना साकडे घालण्यात आले. दरम्यान यशवंत सेनेच्या मागण्यांना प्रतिसाद देत राज्य शासनाने घनगर समाजासाठीच्या विविध बारा योजना लागू करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आल्याची माहीती सेनेचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव दांगडे पाटील यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य यशवंत सेनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनाही मागण्यांचे निवेदन दिले. धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षणासाठी राज्य शासनाने राज्य मागासवर्ग आयोगाकडून वस्तुनिष्ठ अहवाल घ्यावा व केंद्र शासनाकडे आरक्षणासाठी पाठपुरावा करावा, यांसह मेंढपाळांना तातडीने नुकसान भरपाई, मेंढपाळांवरील वाढते हल्ले रोखण्यासाठी ऍट्रॉसिटीसारखा कायदा करणे,
धनगर समाजासाठी आधीच्या फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या बारा योजनांची अंमलबजावणी करणे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकासाठी मुंबईतील स्वदेशी मिलची जागा द्यावी, अहमदनगरचे अहिल्यानगर नामांतर करावे, अशा मागण्या यावेळी यशवंत सेनेच्या शिष्टमंडळाने मांडल्या. याला प्रतिसाद देत समाजासाठीच्या विविध बारा योजनांची तातडीने अमलबजावणी करण्याचा शासन निर्णय दि. 17 ऑगष्ट रोजी निर्गमित केल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी आ. रत्नाकर गुट्टे, यशवंत सेनेचे प्रदेश पदाधिकारी गोविंद नरवटे, बाळासाहेब दोडतले, दादा केसकर, अण्णासाहेब रुपनवर, नितीन धायगुडे, बाबा भोजने, दिलीप गडदे, दीपक बोऱ्हाडे, समाधान पाटील, सतीश हांडे, भगवान हाके, मारुती सरगर, विजय वाक्षे आदी उपस्थित होते.