पिंपरी -पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील विविध महत्त्वाच्या ठिकाणी जाण्यासाठी गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत पीएमपीएमएलला दरवर्षी कोट्यवधी देऊनही शहरातील प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत असेल, तर हे पीएमपीएमएलचे अपयश आहे. आमचे पैसे घेता, तर या शहरातील नागरिकांना चांगली प्रवासी सुविधा द्या, असे पत्र आमदार लक्ष्मण जगताप यांनी पीएमपीएमएलच्या सहव्यवस्थापकीय संचालकांना पाठविले आहे.
“पीएमपीएमएल’ला पाठविण्यात आलेल्या पत्रात आमदार जगताप यांनी असे म्हटले आहे की, चिंचवड विधानसभा मतदारसंघाचा विकासातून कायापालट केला आहे. त्यानुसार किवळे येथील मुकाई चौकात 2015 सुसज्ज बस टर्मिनल उभारले. त्यावर महापालिकेने लाखो रुपये खर्च केले आहेत. पण गेल्या सात वर्षात या बस टर्मिनलचा पूर्ण क्षमतेने वापर होत नसल्याचे दिसत आहे.
हे पीएमपीएमएल प्रशासनाचे पूर्णपणे अपयश आहे. किवळे, मुकाई चौक येथून पुणे मनपा भवन आणि निगडी या दोनच मार्गावर बस उपलब्ध आहेत. मुकाई चौकापासून रावेत, किवळे, मामुर्डी, साईनगर, दत्तनगर, उत्तमनगर, भीमाशंकरनगर इत्यादी दाट वस्तीच्या भागातील नागरिकांसाठी पीएमपीएमएल प्रशासन फिडर रुटसुद्धा सुरू करू शकलेले नाही. त्यामुळे येथील नागरिकांची सार्वजनिक प्रवासासाठी प्रचंड गैरसोय आहेत.
सार्वजनिक व्यवस्था सक्षम नसल्याने नागरिकांना खासगी वाहने आणि रिक्षाने प्रवास करावा लागतो आहे. महापालिका पीएमपीएमएलला दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे अनुदान देते. एवढा खर्च करूनही शहरातील जनतेला चांगली सार्वजनिक सुविधा पुरवली जात नसेल तर ते पीएमपीएमएल प्रशासनाचे अपयशच म्हणावे लागेल. शहरातील विविध मार्गांवर बससेवा सुरू करण्यसाठी लोकप्रतिनिधीकडून वारंवार सूचना करूनही पीएमपीएमएलकडून ठोस कार्यवाही होत नाही.
यापुढील काळात पीएमपीएमएल प्रशासनाने कारभारात आता सुधारणा करावी. किवळे ते पुणे विमानतळ, किवळे ते स्वारगेट, देहूरोड ते हिंजवडी फेज-3, किवळे ते आळंदी, किवळे ते चाकण एमआयडीसी, देहूरोड ते पिंपरीगाव या मार्गावर बस पूर्ववत सुरू करण्यात यावी, असेही आमदार जगताप यांनी “पीएमपीएमएल’ला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.