सातारा (प्रतिनिधी) – सातारा लोकसभा मतदार संघातील समस्त धनगर समाजाच्या वतीने महाराष्ट्राचे नेते आणि भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांना महाराष्ट्र धनगर समाज संघर्ष समितीने जाहीर पाठिंबा घोषित केला आहे.
धनगर समाज ऐतिहासिक काळापासून स्वराज्याशी एकनिष्ठ राहिला आहे. धनगर समाज पूर्वीपासून प्रामाणिक आणि समाजामध्ये मिळुन मिसळुन राहणारा म्हणून ओळखला जातो. आत्ताच्या आधुनिक काळात प्रगतीकडे झेपावत असलेल्या धनगर समाजाचे खासदार उदयनराजे भोसले हे प्रमुख आधारस्तंभ आहेत. समाजाचे कोणतेही प्रश्न सोडवण्यासाठी प्रगल्भता आणि जिगर खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडे आहे.
खासदार उदयनराजे भोसले यांची, राजकारण किंवा समाजकारण करण्याची पारदर्शी असल्याने, सर्व धनगर समाजाचा एकमुखी पाठींबा खासदार उदयनराजे भोसले यांना समाजाच्या विविध बैठकांमधून व्यक्त करण्यात आला असून समाजाचे प्रतिनिधीत्व करणारी धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने गणेश वळकुंदे आणि हिंदूराव हाके यांनी समितीच्या सदस्यांसमवेत खासदार उदयनराजे भोसले यांना समक्ष भेटून अभिवचन आज दिले.
पुण्यशील राजमाता अहिल्यादेवी होळकर घराण्यापासून धनगर समाजाची स्वतंत्र ओळख निर्माण झाली. या पार्श्वभुमीवर धनगर समाज संघर्ष समितीने समस्त धनगर समाजाच्या वतीने आम्हाला दिलेल्या आपुलकीच्या पाठींब्याबाबत आम्ही आभारी आहोत.
अठरा पगड जाती आणि सर्वधर्म पंथांतील व्यक्तींकरीता, माणुसकीला सर्वोच्य प्राधान्य देत सर्वधर्म समभावाच्या नीतीतत्वावर आपण येथुन पुढे अधिक जोमाने कार्य करीत राहू. आमच्या समाजकार्याला समस्त धनगर समाज बंधुभगिनींनी दिलेल्या पाठींब्यामुळे आम्हा निश्चित बळ मिळाले आहे, अशा शब्दात खासदार उदयनराजे भोसले यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.