शिरूर तालुक्यातून कुठलाही माणूस साहेबांकडे गेला अन् त्याच्या खांद्यावर साहेबांनी हात टाकला नाही असं कधी घडलच नाही. साहेब गेल्या दोन वर्षापासून आजारी असताना सुद्धा सामान्य कार्यकर्त्यांना भेटत असत. साहेबांना भेटताना कार्यकत्यांना कधीही वेळ मागावी लागली नाही. ते 24 तास सर्वांसाठी उपलब्ध असत. साहेबांच्या शेवटच्या काळात माझं काहीही होऊ द्या पण “मला माझ्या लोकांना भेटायचं, मला माझ्या ऑफिस घेऊन चला’, असा आग्रह त्यांनी धरला. सातत्याने स्वतः ऐवजी लोकांचा व जनतेचा विचार करणारा हा लढवय्या लोकनेता होता. तालुक्यातील प्रस्थापित लोकांच्या विरोधात लढणारा हा खरा संघर्ष योद्धा होता.
माजी आमदार बाबूराव पाचर्णे साहेब व माझी पहिल्यांदा भेट त्यांचे पुतणे तथा आमचे वर्गमित्र नगरसेवक नितीनदादा पाचर्णे यांच्या माध्यमातून मी कॉलेजला असताना 2004 साली झाली. त्यावेळी नुकतीच विधानसभा निवडणूक तोंडावर होती. पाचर्णेसाहेब यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे प्रभावित होऊन मी भारतीय जनता पक्षाचे काम करण्याचा निर्णय घेतला. तसा मला माझ्या कुटुंबातील राजकीय वारसा नसतानाही मी पाचर्णे साहेबांच्या निवडणूक प्रचारात काम करण्याचा निर्धार केला.
साहेब 2004 साली निवडून येत विधानसभेत गेले, कॉलेज जीवनातील समस्या व मित्रपरिवाराची कामे घेऊन साहेबांकडे जाण्याचा कायम योग आला अन् त्यावेळी प्रथमत: साहेबांतील खरा माणूस मला कळला. घेऊन गेलेली कामे पूर्ण झालीत नाहीत असं कधीही घडलं नाही. शिक्षण संपल्यानंतर भाजप पक्षात सक्रिय काम करण्याचा मानस साहेबांकडे बोलून दाखवला अन् साहेबांनी त्याला हिरवा कंदील दाखवत मला पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. तेथून खऱ्या अर्थाने माझ्या राजकीय जीवनाचा श्रीगणेशा झाला. त्यानंतर नागरगाव ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मला बिनविरोध निवडून येत काम करण्याची संधी मिळाली. योगायोगाने राज्यात, केंद्रात भाजपचे सरकार स्थापन झाले व साहेब दुसऱ्यांदा आमदारपदी विराजमान झाले.
परिसरातील कामाचा पाठपुरावा करत असताना नागरगाव येथील शेलारमळ्यात ग्रामसडक योजनेतून स्वातंत्र्यापासून प्रलंबित असलेला सुमारे 1.75 कोटी रुपये निधीचा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून पूर्णत्वास नेण्यात आला. त्यानंतर रांजणगाव फाटा ते नागरगांव कोद्रेवस्ती हा रस्ता दोन टप्प्यांत सुमारे 1 कोटी गौणखनिज योजनेमधून करण्यात आला. पीएमआरडीए घरकुल योजना, गावठाणअंतर्गत वीर आळी, भंडलकर आळी, चव्हाण आळी कॉंक्रिटीकरण, सकलादी बाबा मंदिर रस्ता व हायमास्ट दिवा प्रत्येकी पाच लाख रुपये, पारगाव नागरगांव पूल दुरुस्ती 4 कोटी रुपये अशी विकास कामे साहेबांच्या माध्यमातून करता आली.
केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना राबविण्याचा आग्रह साहेब नेहमी मला करत असत. त्या माध्यमातून कृषी विभागाच्या विविध योजनेतून ट्रॅक्टर, पॉवर ट्रेलर व अवजारे यांचा लाभ अनेक शेतकऱ्यांना देण्यात आला. गोरगरिब महिलांना उज्वला योजनेतून सुमारे 300 कुटुंबांना कनेक्शन देता आले. 65 वर्षावरील जेष्ठ नागरिकांसाठी एसटीचे 150 स्मार्ट कार्डचे मोफत वार्टप केले. अटल सन्मान योजनेअंतर्गत बांधकाम कामगार नोंदणी व इतर कामगारांना नोंदणी करून त्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देता आला. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या आदिवासी भिल्ल समाजाच्या लोकांना जातीचे दाखले मिळवून देण्याचा साहेबांनी कायम आग्रह धरला त्यामुळे तालुक्यातील अडीच हजार व नागरगाव येथील 150 लोकांना जातीचे दाखले मिळाले.
नागरगाव येथील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत विधवा व परिक्तता व श्रावण बाळ योजनेतून लाभ मिळवून दिल्याने साहेबांनी माझ्या पाठीवर कायमच शाबासकीची थाप दिली. नागरगाव येथील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना त्यांच्याकडे कामासाठी घेऊन गेल्यानंतर हा आपल्या पक्षाचा आहे का? आपले काम करतो का? असे मला साहेबांनी कधीही विचारले नाही व त्यांचे काम साहेब करून देत असत. गावातील व परिसरातील माझ्या कामाची दखल घेऊन मला अध्यक्ष युवा मोर्चा भाजप शिरूर लोकसभा या पदाची जबाबदारी माझ्यावर सोपवली.
साहेबांच्या माध्यमातून अनेक वेळा मुंबई येथील मंत्रालयाचे कामकाज पाहण्याचा मला कायम योग आला. त्यावेळी मोठ्या मनाने साहेबांनी अनेक मंत्र्यांशी परिचय देताना हा माझा कार्यकर्ता पप्पू, खूप चांगले काम करतो असे सांगितल्यावर मला खूप अभिमान वाटायचा, साहेबांच्या माध्यमातून अनेक राज्यातील नेत्यांशी माझा जवळचा संपर्क आला. त्यांच्या राजकीय जीवनात त्यांनी अनेक माणसे जोडली. त्यांच्या अचानक जाण्याने तालुका नव्हे राज्यातील कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला. त्यांच्या निधनाने तालुक्यात खूप मोठी पोकळी निर्माण होणार आहे. अशा लोकनेत्याला, देवमाणसाला नागरगाव ग्रामस्थ व भारतीय जनता पक्ष पुणे जिल्हा यांच्या वतीने विनम्र आदरांजली.
एकनाथ रमेश शेलार,
अध्यक्ष – भाजप युवा मोर्चा शिरूर लोकसभा
संचालक – नागरगाव वि. का. स. से. सोसायटी
माजी सदस्य – ग्रामपंचायत नागरगाव
शब्दांकन – प्रमोल कुसेकर (मांडवगण फराटा)