नवी दिल्ली – पंजाबातील आम आदमीपक्षाच्या ज्या दोन नेत्यांनी अलिकडेच भाजपमध्ये प्रवेश केला आहे त्यांना केंद्राने वाय दर्जाची सीआरपीएफची सुरक्षा पुरवली आहे. सुशीलकुमार रिंकु आणि शीतील अंगुराल अशी त्यांची नावे आहेत. त्यांना फक्त पंजाबच्या हद्दीतच ही सुरक्षा पुरवली जाणार आहे. तत्पूर्वी, भाजपमध्ये प्रवेश केलेल्या पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या या दोन नेत्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
जालंधरच्या खासदार रिंकू आणि जालंधर पश्चिमचे आमदार अंगुरल यांनी दोघांनीही भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर लगेचच नड्डा यांची भेट घेतली. या भेटीत त्यांच्यासोबत पंजाब भाजपचे अध्यक्ष सुनील जाखडही होते. रिंकू यांना भाजपने जालंधरमधून निवडणूक लढवण्यासाठी तिकीट दिले आहे. भाजपमध्ये प्रवेश करताना रिंकू यांनी जालंधरच्या विकासासाठी हा निर्णय घेतल्याचा दावा केला होता.