ICC WTC 2023-25 Points Table Update : वेलिंग्टन येथील बेसिन रिझर्व्ह मैदानावर ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर १७२ धावांनी विजय मिळवल्यानंतर जागतिक कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेच्या गुणतालिकेत बदल झाले आहेत. ऑस्ट्रेलियच्या या विजयाचा फायदा भारताला झाला असून आता ६४.५८ गुणांसह भारत अव्वल स्थानी पोहोचला आहे. भारतानंतर न्यूझीलंड, मग ऑस्ट्रेलियाचा क्रमांक आहे.
गुण तालिकेची स्थिती…
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर न्यूझीलंडच्या गुणांची टक्केवारी ७५ वरून ६० वर घसरली आहे. त्यांनी आतापर्यंत पाच कसोटी सामने खेळले असून तीन जिंकले आहेत. किवी संघाला एका सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. किवी संघ ३६ गुण आणि ६० गुणांच्या टक्केवारीसह दुसऱ्या स्थानावर घसरला आहे.
त्याच वेळी, भारताची गुणांची टक्केवारी ६४.५८ आहे. भारताने आठपैकी पाच सामने जिंकले आहेत आणि दोन गमावले आहेत. एक कसोटी अनिर्णित राहिली. भारताचे ६२ गुण आहेत. ऑस्ट्रेलियाची स्कोअरिंग टक्केवारी ५९.०९ आहे. त्यांना ७८ गुण आहेत. कांगारूंनी आतापर्यंत ११ कसोटी खेळल्या असून सात जिंकल्या आहेत. ऑस्ट्रेलियन संघ तीन वेळा पराभूत झाला असून एक कसोटी अनिर्णित राहिली आहे.
आता ७ मार्चपासून धर्मशाला येथे सुरू होणाऱ्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटीत भारताने इंग्लंडविरुद्ध विजय मिळवल्यास कसोटी चॅम्पियनशिप गुणतालिकेत भारताचे अव्वल स्थान कायम राखले जाईल. तथापि, पाचवी कसोटी अनिर्णित राहिल्यास किंवा इंग्लंड जिंकल्यास, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोघांसाठी गुणतालिकेत भारताला मागे टाकण्याचे दार उघडेल. त्याचबरोबर न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरी कसोटी शुक्रवार, ८ मार्चपासून क्राइस्टचर्चमध्ये सुरू होणार आहे.
NZ vs AUS 1st Test : नॅथन लायनची विक्रमी कामगिरी, ऑस्ट्रेलियाचा न्यूझीलंडवर 172 धावांनी विजय…
बांगलादेश ५० गुणांच्या टक्केवारीसह चौथ्या स्थानावर आहे. पाकिस्तानची गुणांची टक्केवारी ३६.६६ असून तो पाचव्या स्थानावर आहे. वेस्ट इंडिज ३३.३३ गुणांच्या टक्केवारीसह सहाव्या तर दक्षिण आफ्रिका २५ गुणांच्या टक्केवारीसह सातव्या स्थानावर आहे. चौथ्या कसोटीत भारताकडून पराभूत झाल्यानंतर इंग्लंडच्या गुणांची टक्केवारी १९.४४ आहे आणि संघ आठव्या स्थानावर घसरला आहे. वर्ष २०२३-२५ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये इंग्लंडने आतापर्यंत नऊ कसोटी सामने खेळले आहेत आणि तीन जिंकले आहेत. इंग्लंड पाच सामने हरले असून एक कसोटी अनिर्णित राहिली आहे. श्रीलंकेची गुणांची टक्केवारी शून्य असून तो देश नवव्या स्थानावर आहे.