मुंबई – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मंगळवारी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 फायनलसाठी भारतीय संघाची घोषणा केली. अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेचे संघात पुनरागमन झाले आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माकडे कर्णधार पदाची धुरा असेल तर उपकर्णधार पदाचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात WTC फायनल 7 ते 11 जून 2023 दरम्यान लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळली जाईल. 12 जून हा दिवस राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आला आहे. बीसीसीआयने एका निवेदनात म्हटले आहे की, “अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी संघाची निवड केली आहे.”
भारतीय संघाने कर्णधार रोहित शर्मा आणि युवा शुभमन गिल यांच्यावर सलामीची जबाबदारी सोपवली आहे. अजिंक्य रहाणे मधल्या फळीत परतला आहे तर सूर्यकुमार यादवला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. श्रेयस अय्यर दुखापतीमुळे आधीच WTC फायनलमधून बाहेर पडला होता.
केएस भरतच्या खांद्यावर विकेट कीपिंगची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, त्यामुळे इशान किशनला संधी मिळाली नाही. रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांच्यावर स्पिन बॉलिंगची जबाबदारी असेल. अश्विन, जडेजा, पटेल यांच्यासह शार्दुल ठाकूर गोलंदाज अष्टपैलू खेळाडूच्या भूमिकेत दिसणार आहे. तर फास्ट बॉलिंगची जबादारी मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट यांच्या खांद्यावर असणार आहे. भारतीय संघाने शेवटची कसोटी मालिका ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळली. भारताने ही मालिका 2-1 अशी जिंकली होती.
WTC 2023 फायनलसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भरत (विकेट किपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकत