नवी दिल्ली – काही दिवसांपूर्वी एक फॉरवर्ड मेसेज सगळीकडे फिरत होता ज्यात सांगितले होते की नोटांवर काहीही लिहिले तरी त्या अवैध ठरतात आणि मग कायदेशीर चलन म्हणून त्यांना कुठलीही किंमत उरत नाही. त्यात पुढे असे म्हटले होते की, ही माहिती रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या नव्या मार्गदर्शक सूचनानुसार देण्यात आलेली आहे. मात्र अशा कुठल्याही गाईडलाईन्स रिझर्व बँक ऑफ इंडियाने दिलेल्या नाहीत, असा खुलासा सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोमधील फॅक्ट चेकिंग युनिट ने केला आहे.
संबंधित फॉरवर्डेड मेसेज हा फेक असून नोटांवर लिहिले असल्यास त्या चलनात चालणार नाहीत, ही माहिती पूर्णपणे चुकीची असल्याचे पीआयबीच्या फॅक्ट चेक ट्विटमध्ये म्हटलेले आहे. असे असले तरी नोटांवर नागरिकांनी काहीही लिहू नये, असे आव्हान सरकारने केले आहे. रिझर्व बँकेच्या क्लीन नोट पॉलिसीनुसार लोकांना आव्हान करण्यात आले आहे की, नोटांवर लिहिल्यामुळे त्या खराब होतात आणि त्यांचे आयुष्य कमी होते.
पीआयबीच्या फॅक्ट चेक युनिटने या संदर्भात केलेले ट्विट अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या कार्यालयाने आणि अर्थमंत्रालयाच्या ट्विटर हँडलने रिट्विट केले आहे. आरबीआयच्या क्लीन नोट पॉलिसीनुसार लोकांना चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या चलनी नोटा आणि नाणी पुरवण्यात येतात आणि खराब नोटा वेळोवेळी चलनातून काढून घेण्यात येतात.
नोव्हेंबर 2001 मध्ये रिझर्व बँकेने सर्व बँकांना सूचना दिलेल्या आहेत, की नोटांच्या बंडलांवर स्टेपल पिन मारू नये त्याऐवजी बंडल बांधण्यासाठी बँड पॅकेट किंवा कागदी किंवा प्लास्टिकचा बँड वापरण्यात यावा. त्यानुसार सर्व बँका त्याचे पालन करत असतात. जेणेकरून चलनी नोटांचे आयुष्य वाढावे. रिझर्व बँकेने देशातील सर्व बँकांना अशाही सूचना दिल्या आहेत, की लोकांना चांगल्या आणि स्वच्छ नोटा देण्यात याव्यात. बँकेत आलेल्या खराब झालेल्या, मातकट नोटा चलनात फिरवल्या जाऊ नयेत.