व्वा..रे.,पाटबंधारेच्या कामाची तऱ्हा

उजनीच्या पाण्याजवळील पळसदेव तलाव कोरडाच

पळसदेव -पुणे परिसरात समाधानकारक पाऊस झाल्याने उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. अगदी पळसदेवच्या कोरड्या असलेल्या तळ्याच्या भराव्याला लागून उजनीचे पाणी पोहोचले आहे. मात्र, पळसदेवचा तलाव अद्यापही कोरडाच आहे. यामुळे व्वा…रे… पाटबंधारे विभागाच्या कामाची तऱ्हा, अशीच प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून उमटू लागली आहे.

इंदापूर तालुक्‍यात समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने अनेक पाझर तलाव कोरडेच आहेत. जवळपास सहाशे ते सातशे एकरास वरदान ठरलेल्या पळसदेवचा तलाव तर सलग चार ते पाच वर्षांपासून पूर्ण क्षमतेने भरलाच नाही. विशेष म्हणजे याही वर्षी या तलावा लागूनच उजनीचे पाणी आहे, असे असतानाही हा तलाव मात्र अद्यापही कोरडा ठाणच आहे. त्यामुळे या तलावावर आधारीत असलेली शेती मोठ्या संकटात सापडली आहे. शिवाय या परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकरी पशुपालन व्यवसाय करतात. पण, तलावात पाणी नसल्याने परिसरात पशुपालन व्यवसायावरही परिणाम झाला आहे.

पळसदेव तलावात पाणी सोडण्याबाबत आमदार दत्तात्रय भरणे तसेच माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही संबंधित अधिकाऱ्यांना वेळोवेळी सूचना केल्या होत्या. मात्र, अधिकारी लोकप्रतिनिधींच्या सूचनेला जुमानत नसल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. आमदारांनी लक्ष घालूनही तलाव कोरडाच राहिला आहे. त्यामुळे तलावा जवळ पाणी असूनही शेतकऱ्यांना पशूंच्या पाण्यासाठी ऐन पावसाळ्यात वणवण भटकंती करावी लागत आहे.

पळसदेवच्या तळ्यात पाणी सोडण्यासाठी आता शेतकऱ्यांनीही दंड थोपटण्याची तयारी केली आहे. येत्या आठ दिवसांत तळ्यात पाणी सोडण्यास सुरुवात करून पूर्णपणे तलाव भरून घेतला नाही तर पुणे-सोलापूर महामार्गावर शेतकरी गुरे बांधून आंदोलन करण्याच्या पावित्र्यात आहेत.

सध्या, उजनी धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे या तळ्यात पाणी सोडण्याची हीच योग्य वेळ आहे. पुन्हा काही दिवसात धरणाची पाण्याची पातळी कमी झाल्यावर या तळ्यात पाणी सोडण्यास अडचणी वाढणार आहेत. शिवाय हेच तळे पूर्णपणे भरल्यानंतर परिसरातील सहाशे ते सातशे एकर शेतीला आठमाही पाणीपुरवठा याच तळ्यावरून होऊ शकतो.
शासनाला याची पाणीपट्टीच्या स्वरुपात कर देखील मिळत असतो. पाटबंधारे विभाग सलग चार ते पाच वर्षे परिसरातील शेतकऱ्यांना पाणी न देताच पाणीपट्टी आकारून संबंधित शेतकऱ्यांच्या उसातून पाणी बिल वसूल करीत आहे. पाणीपट्टी घेताय तर तळ्यात पाणी सोडा आणि आम्हाला पिकाला पाणी उचलून द्या, मगच पाणीपटट्टी आकारा, अशी मागणी शेतकऱ्यांच्यावतीने केली जात आहे. या परिसरातील अनेक सर्वसामान्य शेतकरी या तळ्यातील पाण्याकडे डोळे लावून बसले आहेत. या पाझर तलावात पाणी आल्यानंतर पळसदेव काळेवाडी म्हात्रेवस्ती, न्हावी, रूई परिसरातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. तरी तातडीने या तळ्यात पाणी सोडून पूर्ण क्षमतेने तळे भरून घ्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

…विहिरी बिनकामी
पळसदेवच्या तलावात सलग चार ते पाच वर्षे पुरेसे पाणी न आल्याने काही शेतकऱ्यांनी तळ्यातच लाखो रुपये खर्च करून पाण्यासाठी खोदलेल्या विहिरी बिनकामी ठरत आहेत. ऐन पावसाळ्यातही या विहिरीतून शेतकऱ्यांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने वैतागून अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळ्याच्या दिवसात उजनी धरणात 25 ते 30 शेतकऱ्यांनी एकत्र गट करून कित्येक किलोमीटरच्या चाऱ्या काढून उजनी धरणातून पाणी आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ही बाब केवळ परिसरातील सधन शेतकऱ्यांना शक्‍य होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.