पळसदेव – इंदापूर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील पळसदेव येथे उपसरपंचपदाच्या निवडणुकीला गालबोट लागले.
उपसरपंच तुळशीराम काळे यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर शनिवार (दि. 24) उपसरपंचपदाच्या निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्य भूषण काळे व मेघराज कुचेकर यांच्यामध्ये लढत झाली. राजकीय खेळी करून उपसरपंचपदाची माळ भूषण काळे यांच्या गळ्यात पडली. सत्ताधारी गटातील सदस्य फुटल्याने विरोधी गटाला आयते उपसरपंचपद मिळाले. त्यामुळे ठरल्याप्रमाणे उपसरपंच निवड न झाल्याने तणाव निर्माण झाला. मेघराज कुचेकर यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी केली.
ग्रामपंचायतीच्या मतदानानंतर सरपंचपद तिघांमध्ये व उपसरपंचपद तिघांमध्ये वाटून देण्यात आले होते. यामध्ये नंदा बनसुडे व अश्विनी काळे यांना प्रत्येकी 2 वर्षे व छाया रंधवे यांना 1 वर्ष सरपंचपद तर सर्जेराव मोरे यांना 2 वर्षे व तुळशीराम काळे व मेघराज कुचेकर यांना प्रत्येकी दीड वर्षे उपसरपंच पद देण्याचे सत्ताधारी सदस्यांमध्ये निश्चित झाले होते. त्यावेळी ग्रामदैवत श्री पळसनाथाच्या मंदिरात बेल उचलून शपथ घेण्यात आली होती. पळसदेव ग्रामपंचायतीत 15 सदस्य संख्या आहे. यामध्ये सत्ताधारी 8 व विरोधी 7 असे संख्या बळ होते. याप्रमाणे मेघराज कुचेकर यांना उपसरपंचपद मिळणार होते. त्यामुळे सत्ताधारी निश्चित होते. मतदानावेळी तुळशीराम काळे यांनी आपले मत विरोधी गटाला देऊन भूषण काळे यांना विजयी होण्यासाठी मदत केली. त्यामुळे कुचेकर यांचा 1 मतांनी पराभव झाला. उपसरपंचाची निवड ठरल्याप्रमाणे झाली नाही, ही वार्ता वाऱ्यासारखी गावात पसरली. निवड प्रकिया पार पडून सदस्य बाहेर पडण्यापूर्वीच कुचेकर यांच्या समर्थकांनी कार्यालयासमोर संताप व्यक्त करून फुटीरवाद्याचा निषेध केला. मेघराज कुचेकर यांनी स्वतःच बाहेर येऊन नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले. त्यानंतर कार्यकर्ते हताश होऊन घरी परतले.