राजगुरूनगर -खेड तालुक्यात करोनाचा कहर सुरूच असून मागील 24 तासांत 683 जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. तर राजगुरूनगर, पाईट, चऱ्होली खुर्द, बोरदरा येथील प्रत्येकी एका अशा चौघांचा मृत्यू झाला आहे. तर 278 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले.
खेड तालुक्यात दिवसागणिक बाधितांची संख्या वाढतच आहे. बाधित गावांची संख्या वाढत आहे तर मृत्यूदर वाढत आहे. वृद्धांबरोबर आता तरुणांच्या मृत्यूदरात आता वाढ होत असल्याने प्रशासनासह नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत.
तालुक्यात आतापर्यंत 24 हजार 627 जण करोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यापैकी 21 हजार 186 जणांनी करोनावर मात केली आहे. तर 265 जणांचा मृत्यू झाला आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागात 2106, चाकण 483, आळंदी 140, राजगुरूनगर 447 असे एकूण 3 हजार 176 बाधितांवर उपचार सुरू आहेत.