बेलसर -पुरंदर तालुका दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. गेल्या वर्षी पावसाने दडी मारल्यामुळे सध्या तालुक्यातील स्थिती चिंताजनक झाली आहे. तालुक्यातील सर्वच धरणांमध्ये मध्यम प्रकल्प त्यासोबतच लघु प्रकल्पांमध्ये फक्त पिण्याचा पाण्याचा साठा उपलब्ध असल्याने पुढील काळामध्ये भीषण परिस्थिती उभी राहणार आहे. दरम्यान, निवडणुका आल्या की गावातील आणि शेतीच्या पाण्यासाठी आमुक आमुक योजना राबवू, शिवार बागायती करू, असे आश्वासन राजकारणी देतात, पण निवडून आल्यावर यांची आश्वासने हवेत विरतात हे मात्र नक्की.
पुरंदर तालुक्यांमधील प्रामुख्याने नाझरे, वीर ही मध्यम प्रकल्पातील धरणे आहेत.घोरवडी, गराडे, पिलानवाडी, माहूर, पिंगोरी, वीरनाला येथे कमी क्षमतेची धरणे आहेत. तालुक्यातील वीर धरण वगळता सर्वच धरणांमध्ये सध्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होईल एवढाच पाणीसाठा उपलब्ध असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. पिण्याच्या पाण्यासोबतच शेतीच्या पाण्याचा एक मोठा प्रश्न समोर उभा ठाकणार आहे.
वाढत्या उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाणी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची भीती आहे. त्यासोबतच सध्या शेतीमध्ये ऊस, सीताफळ आणि इतर भाजीपाला पिकांना लागणाऱ्या पाण्याची गरज भागणार की नाही असा प्रश्न शेतकरी व्यक्त करीत आहेत. त्यात कारखान्यांकडून ऊस तोडणीस केली जाणारी दिरंगाई यामुळे उसाला अधिकचे पाणी द्यावे लागत आहे. एकंदरीत दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गुंजवणीवरून केवळ राजकारणच
पुरंदर तालुक्यासाठी वरदान ठरणाऱ्या गुंजवणी धरणाच्या योजनेवरून आजी-माजी आमदार केवळ राजकारण करण्यात गुंग असल्याने नागरिकांसाठी ही योजना मृगजल ठरणार असल्याचे बोलले जात आहे. तर आजी की माजी आमदार खरे हाही यातील प्रश्न असल्याने नागरिकांची तहान भागवणारा तालुक्यात वाली नाही हे मात्र खरे!ा
अनियमितता, वाढीव दरामुळे…
पुरंदर तालुक्यामध्ये पुरंदर उपसा, आणि जानाई शिरसाई योजना या अंतर्गत तालुक्यातील काही गावांना शेतीसाठी पाणी उपलब्ध करून दिले जाते; परंतु पाण्याची अनियमितता आणि पाण्यासाठी भरावे लागणारे जास्त पैसे यामुळे शेतकऱ्यांच्या जीवावर टांगती तलवार आहे. वाढीव दरामुळे सामान्य शेतकऱ्यांना पुरंदर उपसा सिंचन योजनेचे पाणी घेता येत नसल्याने शेतातील पिके सुकू लागली आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांत शेतीच्या पाण्यासोबतच पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे.
पाणीसाठे आणि योजना
नाझरे जलाशय : जेजुरी नगरपालिका, नाझरे इतर 5 गावे, मोरगाव इतर 16 गावे, पारगाव आणि माळशिरस इतर 23 गावे, जेजुरी औद्योगिक वसाहत, इंडियन शिमलेस कंपनी
घोरवडी लघू प्रकल्प : सासवड नगरपालिका, सुपा आणि पिंपळे ग्रामपंचायत
गराडे लघू प्रकल्प : सासवड नगरपालिका, हिवरे ग्रामीण पाणीपुरवठा
पिलानवाडी : शिवरी प्रादेशिक योजना, 400 केव्ही पावरहाऊस
वीर धरण : सासवड नगरपालिका