कराड – येथील आगशिवनगरातील गणेश कॉलनीत काल रात्री विचित्र प्राण्याने शिरकाव केला. त्यामुळे घाबरलेल्या माणिकराव पाटील यांनी कराडचे वनक्षेत्रपाल तुषार नवले यांना माहिती दिली. नवले यांनी घटनास्थळी भेट दिली असता, तो प्राणी म्हणजे दुर्मीळ खवले मांजर असल्याचे स्पष्ट झाले.
नवले यांनी सोबत आणलेल्या पिंजऱ्यात खवल्या मांजरास बंदिस्त केले. हे खवले मांजर मादी असून, वजन पाच किलो आणि वय अंदाजे दीड वर्ष आहे. या खवल्या मांजराला कराडच्या पशुसंवर्धन रुग्णालयात नेऊन तपासणी केली असता, त्यास कोणतीही इजा झाली नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. नैसर्गिक अधिवासात राहण्याच्या स्थितीत हे मांजर असल्याची खात्री करण्यात आली.
उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल तुषार नवले, शिशुपाल पवार (फिरते पथक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प), मानद वन्यजीवरक्षक रोहन भाटे, वनमजूर हणमंत मिठारे, भारत पवार यांनी या मांजरास पुन्हा नैसर्गिक अधिवासात सुरक्षित सोडले. आगाशिवनगरातील योगेश शिंगण व विशाल साठे यांनी वन विभागास मदत केली.