World Cup 2023 Final IND vs AUS – भारताचे अत्यंत भरात असलेले रोहित शर्मा व विराट कोहली हे बाद झाले त्याचक्षणी आम्हाला विश्वविजेतेपद मिळेल असा विश्वास वाटला, असे मत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने व्यक्त केले आहे.
यंदाच्या स्पर्धेत रोहितने जवळपास प्रत्येक सामन्यात भारतीय संघाला धडाकेबाज प्रारंभ करुन दिला. त्यामुळे नंतर येत असलेल्या फलंदाजांचे काम सोपे ठरत होते. आम्ही याच गोष्टींचा अभ्यास केला. आमचे गोलंदाज प्लॅननुसारच गोलंदाजी करत होते व त्याच्या नूसारच क्षेत्ररक्षणही लावले होते. आम्ही तयार केलेल्या सापळ्यात भारतीय फलंदाज अडकतील हा विश्वास होता. या स्टेडियमवर जवळपास सव्वा लाख प्रेक्षक होते मात्र, पहिल्यांदा रोहित तर नंतर कोहली बाद झाला व हे सगळे प्रेक्षक शांत बसले. त्यामुळे आमच्यावर नव्हे तर भारतीय संघावरच दडपण आले त्याचा आम्हाला लाभ झाला, असेही कमिन्स म्हणाला.
यंदाच्या स्पर्धेत भारतीय फलंदाजी अत्यंत भरात होती. त्यातच भर म्हणजे त्यांचे गोलंदाजही सातत्याने सरस कामगिरी करत होते. यंदाच्या स्पर्धेत प्रथमच असे दिसून आले की त्यांच्या फिरकी गोलंदाजांपेक्षाही सरस कामगिरी त्यांचे वेगवान गोलंदाज करत होते. या सगळ्यासाठी आम्ही योजना तयार केल्या व त्या यशस्वीही करुन दाखवल्या म्हणूनच हे विश्वविजेतेपद मिळवू शकलो, असेही कमिन्स म्हणाला.
खेळपट्टीचा अंदाज योग्य ठरला
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीची पाहणी केल्यावर एक गोष्ट लक्षात आली की ही खेळपट्टी संथ आहे. त्यामुळे आक्रमक फलंदाजी करता येणार नाही. चेंडू बॅटवर येण्यास वेळ लागेल व फलंदाजांना सावध पवित्रा घेतच फलंदाजी करावी लागेल. त्यामुळे आमच्या वेगवान गोलंदाजांना मी चेंडू काहीसा धिम्यागतीने टाकण्यास सांगितले व ही युक्ती यशस्वी ठरली. मोठे फटके मारण्याच्या मोहात भारतीय फलंदाज कोसळले, असे कमिन्स म्हणाला.