U-19 World Cup Final, Ind vs Aus, Who Is Harjas Singh : दक्षिण आफ्रिकेच्या बेनोनी मैदानावर ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा भारताचे विजेतेपदाचे स्वप्न भंग केले. ऑस्ट्रेलियासाठी भारतीय वंशाचा फलंदाज हरजस सिंगने अंतिम सामन्यात टीम इंडियाविरुद्ध 55 धावांची दमदार खेळी केली. तेव्हापासून भारतात हरजस सिंगच्या नावाची चर्चा सुरू झाली. कारण हरजसच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना भारताविरुद्ध 253 धावा केल्या होत्या. याला प्रत्युत्तर देताना उदय सहारनच्या नेतृत्वाखालील अंडर-19 टीम इंडिया काही विशेष करू शकली नाही आणि त्यांना केवळ 174 धावा करता आल्या. त्यामुळे सहाव्यांदा अंडर-19 विश्वचषक जिंकण्याचे भारताचे स्वप्न धुळीस मिळाले.
कोण आहे हरजस सिंग?
19 वर्षीय हरजस सिंग मूळचा भारतीय असून त्याचे कुटुंब 2000 मध्ये चंदीगडहून सिडनीला स्थलांतरित झाले. संपूर्ण स्पर्धेत हरजसची बॅट शांत होती, पण अंतिम फेरीत त्याने दमदार खेळी केली. हरजस हा सिडनीचा असून त्याचा जन्म आणि वाढ ऑस्ट्रेलियात झाली आहे. 2000 मध्ये हरजस सिंगचे वडील चंदीगडहून सिडनीला शिफ्ट झाले. हरजस सिंग यांचे वडील ट्रॅव्हल इंडस्ट्रीशी संबंधित आहेत. हरजस शेवटचा 2015 मध्ये भारतात आला होता.
हरजसचा जन्म आणि संगोपन ऑस्ट्रेलियात झाला आणि त्याने तिथेच क्रिकेटचे धडे गिरवले. हरजसचे वडील इंद्रजित सिंग त्यांच्या काळात चंदीगडमध्ये राज्यस्तरीय बॉक्सिंग चॅम्पियन होते. त्यांची आई अविंदर कौर याही राज्यस्तरीय लांब उडीपटू आहेत. त्यामुळे घरात खेळाचे वातावरण असल्याने हरजसने क्रिकेटची निवड केली. तेव्हापासून तो केवळ ऑस्ट्रेलियाकडून क्रिकेट खेळत आहे.
हरजसने आपल्या क्रिकेट कारकिर्दीला रेव्हस्बी वर्कर्स क्रिकेट क्लबमधून सुरुवात केली आणि क्लब क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली. या कामगिरीनंतर त्याला ऑस्ट्रेलियाच्या अंडर-19 संघात स्थान मिळाले. त्याने नॉर्थम्प्टनमध्ये इंग्लंडविरुद्ध शानदार शतक झळकावले, त्यानंतर बेकनहॅममध्ये इंग्लंडविरुद्धही त्याने 91 धावा केल्या. या खेळीनंतर त्याची अंडर-19 विश्वचषकासाठी संघात निवड झाली.
भारताविरुद्धच चालली बॅट….
19 वर्षांखालील विश्वचषकात अंतिम फेरीपर्यंत हरजस सिंगची बॅट पूर्णपणे शांत होती. पण अंतिम सामन्यात टीम इंडिया समोर दिसताच हरजस फॉर्मात आला आणि त्याने 64 चेंडूत तीन चौकार आणि तीन षटकारांसह 55 धावांची खेळी केली. फायनलपूर्वी 6 सामन्यात हरजसच्या नावावर फक्त 49 धावा होत्या, पण ऑस्ट्रेलियन व्यवस्थापनाला त्याच्यावर पूर्ण विश्वास होता आणि अंतिम फेरीतही कर्णधार आणि व्यवस्थापनाने त्याचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश केला आणि कांगारूंसाठी अंतिम सामन्यात हरजस सिंग हा सर्वाधिक धावा करणारा फंलदाज ठरला.
#U19WorldCup #AUSvsIND Final : 140 कोटी भारतीयांचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले…
डाव्या हाताने फलंदाजी करण्यामागचे मजेशीर कारण…
हरजस सुरुवातीला उजव्या हाताने फलंदाजी करायचा, पण जिथे तो सराव करत होता तिथे त्याच्या उजव्या बाजूला काचेची खिडकी होती आणि हरजसला लेग साईडची खिडकीची काच तुटण्याची भिती होती, त्यामुळे त्याने डाव्या हाताने फलंदाजी सुरू केली आणि तो डावखूरा फलंदाज बनला. मात्र, तो उजव्या हाताने मध्यमगती चेंडू टाकतो.