बासेल – भारताच्या बी.साईप्रणीत व एच.एस.प्रणोय यांनी जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेतील पुरूषांच्या एकेरीत विजयी प्रारंभ केला. महिलांच्या दुहेरीत भारताच्या जे.मेघना व पूर्विशा राम यांनीही आव्हान राखले.
साईप्रणीतने कॅनडाच्या जेसन अँन्थोनी याच्यावर 21-17, 21-18 असा विजय मिळविला. त्याने ड्रॉपशॉट्सचा सुरेख खेळ केला. तसेच त्याने सर्व्हिसवरही चांगले नियंत्रण मिळविले होते. त्याच्या तुलनेत प्रणोयला फिनलंडच्या एतुई हेईनो याच्याविरूद्ध विजय मिळविताना झगडावे लागले. त्याने अटीतटीने झालेला हा सामना 17-21, 21-10, 21-11 असा जिंकला. पहिल्या गेममध्ये त्याला स्वत:च्या खेळावर नियंत्रण ठेवता आले नाही. मात्र दुसऱ्या गेमपासून त्याला सूर सापडला. त्याने स्मॅशिंगच्या जोरकस फटक्यांचा उपयोग करीत विजयश्री खेचून आणली.
मेघना व पूर्विशा यांनी ग्वाटेमालाच्या डायना कोरेलितो सोतो व निक्ती सोतोमेयर यांना 21-10, 21-18 असे पराभूत केले. त्यांनी परतीच्या आक्रमक फटक्यांचा उपयोग केला.