मुंबई – देशासमोर उभ्या असलेल्या कोरोनाशी लढा देण्यासाठी सरकारला मदत म्हणून उद्योजक, सिनेकलाकार, राजकीय नेते, बॉलीवूड कलाकार पुढे सरसावले आहेत.भारतातही लॉकडाउन आहे. या काळात अत्यावश्यक सुविधा सोडल्या तर सर्व कामकाज बंद आहे. या बंदच्या दरम्यान हातावर पोट असलेल्या कामगारांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे यशराज फिल्म्सने या मजुरांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
आतापर्यंत अनेक सामाजिक संस्था आणि सेलिब्रिटी गरजूंच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. काहींनी आर्थिक मदत केली आहे. तर काहींनी शिधा वापट केला आहे. यामध्येच आता यशराज फिल्म्सने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ‘फिल्मफेअर डॉट कॉम’नुसार, कलाविश्वात रोजंदरीवर काम करणाऱ्या कामगारांना यशराज फिल्म्सकडून आर्थिक मदत करण्यात येणार आहे.
कलाविश्वात कारपेंटर, स्पॉट बॉय यांसारखे अनेक लहान-मोठे काम करणारे कामगार आहेत. या साऱ्यांनाच या दिवसात आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे या कामगारांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा करण्याचा निर्णय यशराज फिल्म्सने घेतला आहे. विशेष म्हणजे यशराज फिल्म्सने जवळपास १.५ कोटी रुपयांची तरतूद केली असून या निधीमधून कामगारांना मदत केली जाणार आहे.