शिरूर (प्रतिनिधी) – शिरूर तालुक्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहत कारेगाव व शिरूर शहर येथील जवळपास एक हजार परप्रांतीय कामगार आज मध्यप्रदेश येथे रवाना करण्यात आल्याची माहिती शिरूरच्या तहसिलदार लैला शेख यांनी दिली.
गेल्या अनेक दिवसापासून कोरोना व्हायरसमुळे शिरूर तालुक्यात परप्रांतीय कामगार होते, लॉक डाऊन मुळे सर्व कामे बंद होते, त्यात कोरोनाव्हायरस ची दहशत आणि भीती मोठी असल्याने कामगार या भागात राहण्यास तयार नसल्याने अनेक जण या भागातून पायी आपल्या राज्यात निघाले होते.
या सर्वांना आमदार अशोक पवार, प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख , दौंड विभागाची पोलीस उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या शर्मा, तहसीलदार लैला शेख, पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी विश्वासात घेऊन शिरूर रांजणगाव परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची राहण्याची सोय केली होती. यावेळेस आमदार अशोक पवार व प्रांताधिकारी संतोष कुमार देशमुख यांनी या कामगारांना त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी प्रयत्न सुरू असून तुम्ही घाबरू नका तुम्हाला जे सहकार्य पाहिजे ते आम्ही देणार आहोत असा विश्वास आणि दिलासां दिला होता.
या कामगारांमध्ये मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश येथील कामगारांचा मोठा सहभाग होता. परंतु उत्तर प्रदेश येथे कामगार पाठवण्यास अडचणी असून त्या अडचणी सोडून नंतर उत्तर प्रदेश येथील कामगार पाठवण्यात येणार असल्याचे सांगितले. तर मध्य प्रदेश सरकारकडून कामगारांना आपल्या राज्यात घेण्यासाठी तयार असल्याने अखेर रांजणगाव कारेगाव औद्योगिक वसाहत, शिरूर शहर व आसपास असणाऱ्या मध्यप्रदेश येथील बाराशे कामगारांची यादी तयार केली होती. त्यातील काही कामगार औद्योगिक वसाहत चालू झाल्याने जाण्यास नकार दिला. त्यामुळे जवळपास हजार कामगार मध्यप्रदेश येथील वेगवेगळ्या जिल्ह्यात निघाले .
या सर्वांसाठी खास रेल्वेचे नियोजन करण्यात आले, यासाठी आमदार अशोक पवार, प्रांताधिकारी संतोष कुमार देशमुख, लैला शेख यांनी पुढाकार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार, पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे पाठपुरावा करून अखेर या कामगारांना स्वतंत्र रेल्वेचे नियोजन झाले.
आज अखेर शिरूर, रांजणगाव, कारेगाव या परिसरातून 40 बसच्या माध्यमातून हजारांच्या दरम्यान मध्यप्रदेशातील विविध जिल्ह्यातील कामगारांना उरळीकांचन येथून रेल्वेचे आयोजन करण्यात आले. आज सायंकाळी ही रेल्वे ते उरळीकांचन येथून मध्यप्रदेशकडे रवाना होणार आहे.
शिरूर, रांजणगाव, कारेगाव येथे असणाऱ्या सर्व मध्यप्रदेश येथील कामगारांची वैद्यकीय चाचणी शिरूर ग्रामीण रुग्णालयात केली असून, पुन्हा या कामगारांची वैद्यकीय चाचणी उरळीकांचन येथील रेल्वेस्थानकात होणार आहे. तेथून त्यांना मध्यप्रदेशकडे पाठविण्यात येणार असून, या कामगारांची सर्वतोपरी जेवण, नाष्टा यांचे नियोजन केले आहे. -लैला शेख, तहसीलदार शिरूर