नगर – रस्त्याच्या कामातील तांत्रिक अडचणी संपलेल्या आहेत. किरकोळ अडचणी शिल्लक आहेत. त्याही लवकरच निकाली काढण्यात येतील. मात्र, त्यामुळे आता रस्त्याचे काम रखडणार नाही, याची दक्षता घेऊन ठेकेदाराने तातडीने उद्याच (ता. 25) भिस्तबाग रस्त्याचे काम सुरु करावे, अशी तंबी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी आज दिली.
तोफखाना पोलिस स्टेशन ते भिस्तबाग चौक व तेथून महालापर्यत रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याचे आदेश त्यांनी दिले. गुलमोहर चौक ते सोनानगर चौकापर्यतचे काम उदयापासूनच सुरू होईल, अशी अपेक्षाही महापौर वाकळे तोफखाना पोलिस स्टेशन ते भिस्तबाग चौक व तेथून महालापर्यतच्या रस्त्याचे काम मंजूर आहे. कामास कार्यारंभ आदेशही देवून खूप कालावधी लोटला आहे. त्यात रस्त्याच अवस्था आता अत्यंत बिकट झाली आहे. मात्र, अशाही अवस्थेत रस्त्याचे काम बंदच आहे. ते काम सुरु करण्यासाठी आज संबंधित अधिकारी, ठेकेदार यांची संयुक्त बैठक महापौर वाकळे यांनी बोलाविली होती.
महापौर वाकळे यांच्यासह उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे, शहर अभियंता सुरेश इथापे, नगररचनाकार राम चारठाणकर, यंत्र अभियंता परिमल निकम, इलेक्ट्रीक विभाग प्रमुख कल्याण बल्लाळ, शहर पाणी पुरवठा विभाग प्रमुख आर.जी.सातपुते, अभियंता मनोज पारखे, ठेकेदार ए. जी. वाबळे, नगरसेवक महेंद्र गंधे, नगरसेवक मनोज दुलम, उदय कराळे, तायगा शिंदे, अजय चितळे यावेळी उपस्थित होते.
गुलमोहर रोड ते सोनानगर चौकापर्यत कामास कोणताही अडथळा नाही. त्यामुळे त्या भागात कामास सुरुवात करावी, असे आदेश महापौर वाकळे यांनी दिले. ज्या भागात रस्त्याच्या कामात पाण्याची लाइन, इलेक्ट्रीक पोल आदी अडथळा नाहीत, अशा ठिकाणी देखील काम सुरू करण्याचे आदेश महापौरांनी दिले.
दरम्यान, रस्ता कामात फार अडथळा ठरत नसतील, अशी झाडे तोडू नयेत, अशी भूमिका भाजपा शहर जिल्हाध्यक्ष गंधे यांनी मांडली. ठेकेदार वाबळे यांनी गुलमोहर चौक ते भिस्तबाग चौकाचे काम तातडीने सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिले.