जामखेड – खर्डा येथील एका युवकाने गळफास घेतल्याने त्यास उपचारासाठी तातडीने जामखेड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र टाकसाळ यांनी त्यास मृत घोषित केले. त्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तसेच वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना मारहाण करून रुग्णालयातील सामानाची तोडफोड केली. याप्रकरणी डॉ. टाकसाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, डॉ. टाकसाळ हे ग्रामीण रुग्णालयात बाह्यरुग्ण तपासणी करत असताना यातील आरोपी सूरज विलास पवार, सागर धूलचंद पवार, अभिजित अनिल चव्हाण, निवृत्ती गोरख चव्हाण, नीरज वसंत कसबे व इतर दोन ते तीन जण (सर्व रा. खर्डा, ता. जामखेड) हे सुजित अनिल चव्हाण (वय 22) या या रुग्णाला घेऊन आले. त्यांनी रुग्णाला लवकर पहा, असे म्हणाले. डॉ. टाकसाळ यांनी सुजित चव्हाण यास तपासले. त्यानंतर त्यास मृत घोषित केले.
त्यादरम्यानच्या काळात मयतासोबत आलेल्या नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयातच गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी डॉ. टाकसाळ यांनी तुम्ही दवाखान्यात गोंधळ का घालत आहात, अशी विचारणा केली. त्याचा राग आल्याने त्यांनी डॉ. टाकसाळ व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, दमदाटी करून धक्काबुक्की केली. तसेच रुग्णालयलाच्या खोलीचा दरवाजा व रुग्णांसाठी बसविलेल्या सॅनिटायझर मशिनची तोडफोड केली. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.